बेळगाव लाईव्ह : सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेकांना आपलंस करणारे सुळगे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य कै. बाळू पाटील (‘शेंदूर बाळू’) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आजवर केलेल्या कामांमुळे जनतेमध्ये त्यांचे अढळ स्थान निर्माण झाले आहे मात्र त्यांच्या निधनामुळे न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
तरुणांचे प्रेरणास्थान, मानवतेचा आदर्श निर्माण करणारे असे बाळू पाटील हे त्यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे अधिक लोकप्रिय होते. त्यांच्या कपाळावरील टिळ्याचे एक विशेष असे वैशिष्ट्य होते. एकेकाळी लोक त्यांच्या कपाळावरचा टिळा बघून त्यांना ओळखायचे. आणि यामुळेच त्यांचे नाव ‘शेंदूर बाळू’ असे प्रचलित झाले. बेळगाव ते शिनोली- नागनवाडी-चंदगड- खानापूर- गोवा भागात ख्याती असलेले व राजकीय लोक, हिंदू संघटना, आदरणीय ग्रामस्थ, पोलीस विभाग यांच्या कायम संपर्कात असणारे कै. बाळू पाटील गेल्या ३० वर्षांपासून हिंदू संघटनेसाठी कार्यरत होते.
त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्या त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमुळे समाजात एक दबदबा तयार झाला. अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला मदत करायची अशी सवय स्वतःसोबत जडवून घेतलेल्या कै. बाळू पाटील यांनी आजवर अनेकांना मदतीचा हात देऊ केला.
राजकरण-निवडणुकीच्या वेळी अहोरात्र प्रचार, सुरुवातीच्या काळात समिती आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्षात सक्रिय झालेले, त्याचबरोबर हिंदू संघटना, श्रीराम सेना, बजरंग दल अशा संघटनांमध्ये कट्टर कार्यकर्त्या म्हणून हजर राहणे, कोविड कालावधीत अनेकांना घरोघरी जाऊन केलेली मदत, जीवन संघर्ष फाउंडेशन रुग्णवाहिका सेवा, ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक म्हणून काम अशी समाजसेवा करणाऱ्या बाळू पाटील यांना लोकांनी मानाचे स्थान दिले.
आपल्या रुबाबानेच प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारे असे कै. बाळू पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुळगे(उ) गावचा विकास, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा. रस्त्यांचे काम, गटारी आणि स्वच्छता या सर्व कामात देखील झोकून देऊन प्रामाणिकपणे सेवा केली. अध्यात्माची आवड, गावातील वारकरी संप्रदायाचे काम, मंदिर, देवस्थानचे काम अशा अनेक कामात मन लावून आणि जीव ओतून ते काम करायचे. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहावे तितके कमीच.. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असून त्यांनी केलेली कामे हि ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ अशाच पद्धतीची आहेत, इतकेच सांगू शकतो.
-डॉ. गणपत पाटील