बेळगाव लाईव्ह:कित्तूर राणी चन्नम्मा यांचा विजयोत्सव येत्या 23 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असताना उद्या सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी ‘बैलहोंगल बंद’ची हाक देण्यात आली आहे.
हे वर्ष कित्तूर विजयोत्सवाचे व्दी-शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. मात्र या विजयोत्सवापासून बैलहोंगलला वंचित ठेवण्यात आले असून संबंधित कार्यक्रम फक्त कित्तूर पुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत.
वीर राणी चन्नम्मा यांची समाधी असलेल्या बैलहोंगल येथे विजयोत्सवाचा एकही कार्यक्रम आयोजित केला जाणार नसल्याच्या निषेधार्थ उद्या सोमवारी बैलहोंगल बंदची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती वीर राणी कित्तूर चन्नम्मा सुवर्णोत्सव समितीने दिली आहे.
तसेच समस्त जनतेसह व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक वगैरे सर्वांनी उद्या सोमवारी आपापले व्यवहार बंद ठेवून ‘बैलहोंगल बंद’ यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.