बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी शुभा बी. यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला. बेळगाव महापालिका आयुक्तपदी कार्यरत असलेले अशोक दुडगुंटी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी नूतन आयुक्तपदी शुभा बी.यांची नियुक्ती झाली. माजी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नूतन आयुक्त शुभा बी यांना अधिकारपदाची सूत्रे सुपूर्द केली.
यावेळी नूतन मनपा आयुक्त शुभा बी. यांनी बेळगावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. महापौर, आमदार, नगरसेवकांना विश्वासात घेऊन कर्तव्य बजावण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
यावेळी पहिल्याच दिवशी शहरातील कन्नड नामफलकाची सक्ती, याअंतर्गत ६० टक्के कन्नड भाषेचा वापर आणि ४० टक्के इतर भाषेच्या वापरातील नामफलक, कन्नड ही अधिकृत भाषा म्हणून वापरली जावी, सरकारी कर्मचाऱ्यांनी कन्नड ध्वज चिन्ह असलेले ओळखपत्र परिधान करावे अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केल्यामुळे मराठी भाषिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
कर संकलनासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, कर संकलन शहराच्या विकासासाठी पूरक आहे. पायाभूत सुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कर संकलन आवश्यक आहे. १९७६ च्या नियमावलीनुसार कर थकबाकी वसूल करण्यात येणार असून या कार्यवाहीसाठी विशेष पथक तयार करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी मनपा उपायुक्त रेश्मा तालिकोटी, उदयकुमार, मनपा अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.