बेळगाव लाईव्ह : महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या अप्पी पाटील यांनी बंडखोरी करत चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला असून, त्यांचा अर्ज भरताना काँग्रेसचे गोपाळराव पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रभाकर खांडेकरही तसेच संविधान बचावमधील कॉ.संपत देसाई, कॉ.संजय तर्डेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील उपस्थित राहिल्याने चंदगडमधील बंडखोरी चांगलीच चर्चेत आली आहे.
अप्पी पाटील हे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या बंधूंचे मेहुणे असून आज सतीश जारकीहोळी आणि अप्पी पाटील यांची भेट झाली आहे.
त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर झळकत असून अप्पी पाटलांना सतीश जारकीहोळी यांचा पाठिंबा मिळणार का? बेळगावच्या राजकारणात किंगमेकर ठरलेले आणि राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सतीश जारकीहोळी यांच्या राजकीय मार्गदर्शनातून अप्पी पाटलांना फायदा होईल का? याबाबत आता चंदगड विधानसभा मतदार संघासह बेळगावमध्येही चर्चा रंगू लागली आहे.
अपी पाटील हे गोकाकचे आमदार भाजप नेत रमेश जारकीहोळी यांचे मेव्हणे आहेत यासह ते कोल्हापूरचे काँग्रेस नेते बंटी पाटील यांचे देखील समर्थक मानले जातात परिस्थितीत जारकीहोळी कुटुंबीयांनी चंदगड तालुक्यात लक्ष घातले तर
अप्पी पाटील यांचे पारडे जड होऊ शकते असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. चंदगड तालुक्यात विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती झालेली बंडखोरी त्यामुळे होणाऱ्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.