बेळगाव लाईव्ह :खानापूर जांबोटी मार्गावरील शिवाजीनगर पुलावर काल शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक जण ठार तर अन्य दोघेजण जखमी झाले होते. त्या जखमींपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या 2 झाली आहे.
शिवाजीनगर पुलावर काल शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या दुचाकी अपघातामध्ये रामगुरवाडी येथील शंकर धाकलू गुरव हा जागीच ठार झाला होता.
त्याचप्रमाणे त्याचा काका रवळू गुरव आणि नागुर्डा येथील दुचाकीस्वार अमोल खोबान्ना पाखरे हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मात्र या दोघांपैकी मयत शंकर याचा काका रवळू गुरव यांचे उपचाराचा फायदा न होता काल रात्रीच निधन झाले. उत्तरीय तपासणीनंतर आज शनिवारी सकाळी दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दोन्ही मृतदेहावर रामगुरवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. या पद्धतीने एकाच कुटुंबातील पुतण्या व काका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ रामगुरवाडी ग्रामस्थांवर आली असून याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.