बेळगाव लाईव्ह :देशातील आजच्या युवा पिढीने आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकू नये आणि भेदभाव न करता संघटित राहून देशाला एकसंध ठेवावे, हे आवाहन आहे 12 ज्योतिर्लिंगांच्या पायी प्रवासाला निघालेल्या धुळे (महाराष्ट्र) येथील दिनेश धर्मा बोरसे या भक्ताचे.
सोमनाथ येथून आपल्या 12 ज्योतिर्लिंग दर्शनाच्या पायी प्रवासाला प्रारंभ करणाऱ्या दिनेश बोरसे यांचे आज रामेश्वर येथून बेळगावमध्ये आगमन झाले. त्यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना त्यांनी उपरोक्त आवाहन केले. दिनेश बोरसे म्हणाले की, धुळे येथून मी पायी चालत 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलो आहे.
सोमनाथ येथून मी माझ्या पायी यात्रेतला सुरुवात केली असून बारा ज्योतिर्लिंग करत करत मी आता रामेश्वर येथून भीमाशंकरकडे निघालो आहे. माझ्या या पायी यात्रेचे दोनच मुख्य उद्देश आहेत, त्यापैकी एक म्हणजे मुलांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकू नये. आपल्याला लहानाचे मोठे केलेल्या आपल्या जन्मदात्यांना त्रास देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनी संघटित राहून आपला संपूर्ण देश एक संध ठेवावा. रामेश्वर येथून बेळगावपर्यंत येण्यासाठी मला जवळपास दोन -अडीच महिने लागले आहेत.
माझं जेवण वगैरे फक्त रात्रीच होतं. अन्यथा दिवसभर मी पाणी वगैरे पिऊन किंवा कोणी शीत वगैरे दिली तर त्यावरच राहतो. ज्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असेल तेथील लोकांना मी 12 ज्योतिर्लिंगाच्या पायी प्रवासाला निघाल्याचे सांगून जेवणाची व राहण्याची सोय करण्याची विनंती करतो. सुरुवातीला मी दररोज 50 -60 कि.मी. अंतराचा पायी प्रवास करत होतो. मात्र आता सतत चालल्यामुळे माझी क्षमता थोडी कमी झाली आहे. आता अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे मी दररोज अंदाजे 20 -25 कि.मी. चालत असेन.
तब्येत थोडी खालवल्यामुळे एका डॉक्टरांनी मला औषधाच्या गोळ्याही दिल्या आहेत. युवा पिढीला मी एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही चांगल्या नोकरीला लागता, चांगला उद्योग व्यवसाय करता तेंव्हा माझ्या फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकू नका आणि दुसरी गोष्ट आपल्या देशात भेदभाव करू नका तो पसरवू नका, एवढीच माझी विनंती आहे, असे दिनेश यांनी सांगितले.