बेळगाव लाईव्ह : बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे देशभरात अनेक ठिकाणी धावत असून केवळ बेळगावला हि रेल्वे पोहोचण्यात उशीर होत आहे. पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रयत्न सुरू केले असून मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेली वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच बेळगावमध्ये दाखल होणार आहे. यामुळे बेळगावच्या नागरिकांना आता वेगवान वंदे भारत प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मात्र पुणे – हुबळी मार्गाप्रमाणेच बेंगळुरू – बेळगाव, वास्को – बेळगाव किंवा मुंबई – बेळगाव या मार्गावर देखील वंदे भारत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेळगावकर करत आहेत.
बेंगळुरू ते बेळगाव या वंदे भारत ट्रेनच्या यशस्वी चाचणीनंतर हिवाळी अधिवेशनात ही ट्रेन सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेंगळुरू आणि बेळगाव दरम्यानच्या सध्याच्या रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणे कठीण असल्याचे सांगितले. वंदे भारत साठी असणारा निर्दिष्ठ पल्ला, रेल्वे मार्ग यासह अनेक कारणे पुढे करत बेळगावला येणारी वंदे भारत हुबळीला वळविण्यात आली, या मागे नेमका कुणाचा हात आहे? बेळगावला वंदे भारत येण्यापासून रोखण्यात कोण राजकारण करत आहे? आजवर बेळगावला येणारे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प हुबळी आणि धारवाड ला वळविण्यात आले, त्याचप्रमाणे वंदे भारत मागे देखील राजकारण सुरु आहे का? असा प्रश्न आता बेळगावकरांमधून उपस्थित केला जात आहे.
बेळगाव – महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिकांच्या दृष्टीने प्रवाशांच्या सोयीसाठी व व्यापार-उदिम वाढविण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या जिल्ह्यात बेळगावचे नाव अव्वल स्थानावर येते. मात्र व्यापार-उदीम वाढविण्याच्या दृष्टीने ज्या वेगाने बेळगावमधील पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे होते त्यापेक्षा सर्वात धीम्या आणि उलट्या गतीने बेळगावचा विकास सुरु असल्याचे दिसत आहे. आजवर बेळगावला आलेले अनेक प्रकल्प लोकप्रतिनिधींनी परस्पर हुबळी – धारवाडला वळविले. वंदे भारत बेळगावमधून धावणार अशी माहिती पुढे येत असतानाच अचानक हि रेल्वे हुबळी धारवाड पर्यंत थांबवण्यात आली..! यामागचे नेमके राजकारण काय? याचा बोलविता धनी कोण असेल? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
बेळगाव – बेंगळुरू हा आधीपासून वंदे भारतासाठी प्रस्ताव होता. मात्र रेल्वे मार्ग सक्षम नाही असे कारण देत बेंगळुरू – बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. मात्र आता याच मार्गावरून हुबळी – पुणे मार्गावर वंदे भारत कशी काय धावू शकते? जर त्यावेळी अशा अडचणी होत्या तर मग अचानक या अडचणी दूर कशा झाल्या? हुबळी – पुणे मार्गासाठी वंदे भारत धावू शकते तर मग बेंगळुरू – बेळगाव, गोवा – बेळगाव किंवा मुंबई – बेळगावला वंदे भारत का धावू शकणार नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी बेळगावमधून वंदे भारत सुरु करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला खासदार जगदीश शेट्टर यांचे प्रयत्न मात्र कमी पडलेले दिसत आहेत. जगदीश शेट्टर बेळगावच्या खासदारपदी निवडून आल्यानंतर बेळगावचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा जनतेतून होती. मात्र त्यांच्या विजयानंतर देखील त्यांचे हुबळी वरचे प्रेम अधिक दृढ असल्याचे वंदे भारत एक्स्प्रेसच्या हुबळी -पुणे मार्गाच्या शुभारंभावरून दिसून येत आहे.
यामुळे वंदे भारत जर हुबळी – पुणे सुरु होऊ शकते तर बेंगळुरू – बेळगाव, गोवा – बेळगाव, मुंबई – बेळगाव यासारख्या महत्वपूर्ण मार्गावरूनही धावू शकते, हे यावरून स्पष्ट होते. मात्र याकडे आता लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
बेळगाव शहरा पर्यंत वंदे भारत रेल्वे पोहोचण्यास इतका उशीर का झाला हा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. बंगळुरु हुबळी वंदे भारत बेळगाव पर्यंत विस्तार करण्यासाठी रेल्वे खात्याने तांत्रिक अडचणी दिल्या होत्या मात्र हुबळी पुणे रेल्वे बेळगाव वरूनचं धावणार आहे इथे तांत्रिक अडचणी कुठे गेल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंदे भारतचे हुबळीहुन बेळगाव पर्यंत विस्ताराला टेक्निकल प्रॉब्लेम होता की प्रल्हाद प्रॉब्लम की हुबळीच्या खासदारांचा प्रॉब्लेम असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगावला केवळ एक आणि हुबळीला दोन दोन वंदे भारत असे प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होऊ लागलेले आहेत.