बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू हुबळी बेळगाव वंदे भारत ट्रेनचा मुहूर्त लागला नाही मात्र बेळगाव मार्गावरून पुण्यापर्यंत वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगावकरांच्या प्रतीक्षेत असलेली वंदे भारत रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे बेळगाव मधून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे.
पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेने सुरू प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना आता वंदे भारतने जलदगतीने पुण्याला पोहोचता येणार आहे.
पुणे- बेंगळुरू रेल्वे मार्गावरील विद्युतकरणाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आहे.
मिरज ते कुडची या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण झाल्याने पुणे-बेंगलोर मार्गावरील विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे.तसेच बेळगाव-बेंगलोर मार्गावर वंदे भारतची चाचणी यापूर्वी घेण्यात आली आहे. परंतु वेळेचे अडसर असल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. यानंतर भारतीय रेल्वेने बेळगाव पुणे मार्गावर वंदे भारत सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली होती.
मागील महिनाभरापासून वंदे भारत एक्सप्रेस साठी सर्व रेल्वे स्थानकात आवश्यक बदल केले जात आहेत.
हुबळी हून सकाळी पाच वाजता निघणारी वंदे भारत बेळगावला सात वाजता पोहोचेल. त्यानंतर बेळगावहून पुढे मिरज, सांगली, सातारा मार्गे दुपारी दीड वाजता ही गाडी पुण्याला पोहोचेल.
त्याचप्रमाणे पुण्याहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी हुबळीकडे निघणारी गाडी बेळगावला रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल. दरम्यान या वंदे भारत संदर्भात रेल्वे विभागाकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
रेल्वे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 17 सप्टेंबर पासून सदर रेल्वे सुरू व्हायची शक्यता आहे या बेळगाव हुबळी पुणे मार्गावर वंदे भारत सुरू झाल्याने बेळगावहून पुण्याला जाणाऱ्या लोकाना जलद गतीने पोचता येणार आहे.