बेळगाव लाईव्ह:डांबरीकरण उखडण्याबरोबरच खड्डे पडून दुर्दशा झालेल्या रस्त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून घडलेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजवर घडली. या घटनेमुळे सदर उड्डान पुलाच्या रस्त्याचे धोकादायक स्वरूप पुन्हा अधोरेखित झाले आहे.
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिज अर्थात उड्डाण पुलाच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून अलीकडे या पुलावरील रस्ता जीवितास धोका निर्माण करणारा अपघात प्रवण बनला आहे. अलीकडे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या पुलावरील रस्त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पाहणी केली होती. तसेच पुलावरील रस्ता व्यवस्थित दुरुस्ती करण्याचे आदेश दिला होता.
त्या आदेशाची अंमलबजावणी करत रस्त्यावरील खड्डे काँक्रेट टाकून बुजवण्यात आले असले तरी ते काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एकंदर सध्याच्या घडीला तिसऱ्या रेल्वे गेट उड्डान पुलावरील डांबरीकरण उखडलेला असमतोल, खड्डे पडलेला रस्ता वाहन चालकांसाठी विशेष करून दुचाकी वाहन चालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.
सोशल मीडियावर या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून दुचाकीस्वारांनी शक्य असल्यास सदर उड्डाण पुलावरून जाणे टाळावे प्रवासासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो परंतु स्वतःच्या जीवापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही, हे वाहनचालकांनी ध्यानात घ्यावे. आपल्या प्रवासासाठी या उड्डाण पुला ऐवजी पर्यायी मार्ग अवलंबवावा असे आवाहन जागरूक नागरिकांकडून सोशल मीडियावर केले जात आहे.
तरी याची गांभीर्याने दखल घेऊन लोकप्रतिनिधींसह महापालिका, रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलावरील रस्ता रहदारी योग्य सुरक्षित बनवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.