Friday, November 15, 2024

/

‘त्या’ वादग्रस्त रस्त्याचा प्रकल्प मागे घ्यावा; मुळगुंद यांची डीसींकडे मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहापूर येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या पी. बी. रोडपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर आवश्यक कठोर कारवाई करावी आणि सदर वादग्रस्त रस्त्याचा प्रकल्प मागे घेण्यात यावा, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगावचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आपल्या या मागणीचे निवेदन सुजित मुळगुंद यांनी आज मंगळवारी जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांना सादर केले आहे. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या (बीएससीएल) 2022 -23 सालच्या अहवालानुसार बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून जुन्या पी. बी. रोड अर्थात धारवाड रोडपर्यंत व्हाईट टॉपिंगसह 560 मी. लांब आणि 80 फूट रुंदीचा रस्ता करण्यासाठी निविदा काढण्यात आली.

सदर 7.02 कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याचे काम 11 नोव्हेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2022 या कालावधीत पूर्ण करण्यात आले. तत्पूर्वी रस्त्याच्या या प्रकल्पाचा खर्च 6.72 कोटी इतका आणि रस्त्याचे काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2022 ही निश्चित करण्यात आली होती. मात्र कोरोना प्रादुर्भाव काळामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. बेळगावच्या नगर विकास योजनेनुसार (सीडीपी) पूर्वी हा रस्ता 30 फुटाचा होता. नव्या रस्त्याच्या निर्मितीसाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला महापालिकेच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची गरज होती.

मात्र ते देण्याकरिता त्यावेळी बेळगाव महापालिकेचे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नव्हते. त्यामुळे तत्कालीन प्रशासकाने सल्लागार मंडळाच्या अहवालावर आधारित ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले. त्यानंतर निविदा काढून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा रस्ता भूसंपादन प्रक्रिया व्यवस्थित न राबवता घाईगडबडीत करण्यात आला होता.

आता न्यायालयाने जमीन मालक बाळासाहेब पाटील यांना सुमारे 20 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश महापालिकेला दिला आहे. ही नुकसान भरपाई दिल्यास याचिका दाखल केलेल्या आणखी तीन जमीन मालकांना 45 कोटी रुपये देण्याची तयारी बेळगाव महापालिकेला करावी लागणार आहे. त्यापेक्षा हे सर्व टाळून जनतेचा पैसा वाचविण्यासाठी महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाने शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या पी. बी. रोड पर्यंतच्या रस्त्याच्या प्रकल्पातून महापालिकेच्या माघारीचा निर्णय घ्यावा आणि भू-संपादित केलेल्या जमिनी संबंधित जमीन मालकांना परत कराव्यात.

यामुळे त्या जमीन मालकांना जवळपास 45 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे संकट टळेल आणि महापालिकेला केवळ स्मार्ट सिटीने अर्धा किलोमीटर रस्त्यासाठी खर्च केलेल्या सुमारे 7 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल.

तसेच शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या पी. बी. रोड पर्यंतच्या रस्त्याचा प्रकल्प वादग्रस्त असल्यामुळे तो मागे घेण्यात यावा, अशा आशयाचा तपशील सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.