बेळगाव लाईव्ह : शनिवार दि. ७ सप्टेंबर पासून श्री गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून बेळगावसह शहर आणि परिसरातील सर्वच सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही धावाधाव सुरु झाली आहे.
अनेक ठिकाणी आकर्षक देखावे, प्रतिकृती सादर करण्यात आल्या असून काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये अजूनही सजावटीचे कामकाज सुरु आहे.
बेळगावमधील छत्रपती शिवाजी नगर, दुसरी गल्ली येथे उत्तराखंड येथील श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हिंदूंचे पवित्र स्थान आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री केदारनाथच्या दर्शनासाठी प्रत्येकजण पोहोचू शकत नाही, यामुळेच बेळगावमध्ये श्री केदारनाथच्या अनुभूती घेता यावी या उद्देशाने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महिनाभराच्या अथक परिश्रमानंतर हि प्रतिकृती उभी केली आहे.
दिवसभर नोकरी – व्यवसाय करून संध्याकाळच्या वेळेत एकजुटीने काम करून येथील युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हि प्रतिकृती साकारली असून उत्तराखंड येथील श्री केदारनाथच्या हुबेहूब अनुभूती याठिकाणी येत आहे.
मंडपाच्या आत आकर्षक अशी श्रीमूर्ती विराजमान करण्यात आली असून केदारनाथ गर्भगृह तसेच मंदिर परिसरातील अनेक गोष्टींचा समावेश या प्रतिकृतीत कर्नूयात आला आहे.
केवळ उत्सव नव्हे तर उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात देखील हे मंडळ अग्रेसर असून या मंडळाच्या माध्यमातून अनेक सेवाभावी संस्था देखील कार्यरत आहेत.
रक्तदान शिबीर, समाजातील अडलेल्या नडलेल्या गरजू नागरिकांना मदतीचा हात यासारखे अनेक उपक्रम याठिकाणी राबविले जातात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या श्री केदारनाथच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी वाढत असून बेळगावसह परगावाहून येणाऱ्या नागरिकांनाही श्री केदारनाथाचे दर्शन घेता येणार आहे.