बेळगाव लाईव्ह : हुबळी – पुणे या मार्गावरून आता वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असून याचा लाभ बेळगावकरांनाही घेता येणार आहे. मात्र हुबळी -पुणे याप्रमाणेच बेंगळुरू – बेळगाव मार्गावर वंदे भारत सुरु करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. पुण्याहून बेळगाव पर्यंतच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेला येत्या 15 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असून पुण्याप्रमाणे बेंगळूर येथून बेळगावपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून ही रेल्वे सेवा देखील लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.
बेळगाव येथे आज मंगळवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, खासदार झाल्यानंतर मी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून बेळगाव मार्गे सुरु केली पाहिजे अशी मागणी केली होती. तेंव्हा त्यांनी माझी मागणी मान्य करून दोन-तीन महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे बेंगलोरहून हुबळी -धारवाडपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत यावी अशीही मागणी मी केली होती.ती मागणी देखील लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार पुण्याहून बेळगावपर्यंतची वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू झाली पाहिजे या आमच्या मागणीची पूर्तता होत आहे.
या अगोदर हुबळी बेळगाव दरम्यान टेक्निकल एरर होता आत्ता तो टेक्निकल एरर संपलाय असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे बेळगाव बेंगळूरूह बंदे भारत सुरू होईल असे ते म्हणाले.
येत्या 15 सप्टेंबरपासून पुण्याहून बेळगावपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार असून त्या दिवशी सायंकाळी आम्ही बेळगाव रेल्वे स्थानकावर विशेष समारंभाचे आयोजन करत आहोत. बेळगाव ते हुबळी धारवाड दरम्यानच्या नव्याने मंजूर झालेल्या कित्तूर मार्गे बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासंदर्भात बोलायचे झाल्यास या मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया काही महिन्यात पूर्ण होईल.
या पार्श्वभूमीवर बेंगलोर होऊन हुबळी धारवाड पर्यंत असलेले वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा बेळगाव पर्यंत सुरू व्हावी यासाठी या सकाळीच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची चर्चा केली आहे. थोडक्यात पुण्याप्रमाणे बेंगळूर येथून बेळगाव पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची सेवा सुरू व्हावी यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात पुढील आठवड्यात मी पुन्हा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असून ही रेल्वे सेवा देखील लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.