बेळगाव लाईव्ह : सहकार महर्षी दिवंगत अर्जुनराव गोविंदराव घोरपडे यांनी बेळगावच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी मराठा मंदिर येथे भव्य कार्यक्रमाचे आयॊजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे खासदार शरद पवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर निवृत्त सहकार व पणन अधिकारी दिनेश ओऊळकर यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मराठा को-ऑप. बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील, मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव ,जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा भाविकाराणी होनगेकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा मंदिर सभागृहाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जीवनावर आधारित ‘स्मृतिगंध’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना खास. शरद पवार म्हणाले, भारतातील सहकार चळवळीचा पाय कर्नाटकातील गदग मध्ये रोवला गेला. १९०४ साली सहकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर १९०६ साली पहिली सहकारी संस्था गदग मध्ये सुरु झाली. त्यानंतर सहकाराचे लोण सर्व देशभरात पसरले आहे. दिवंगत अर्जुनराव घोरपडे यांनी विविध क्षेत्रातील लोकांना एकत्रित आणून मराठा बँकेची स्थापना केली. सलग २५ वर्षे या संस्थेत अध्यक्षपदाची धुरा सांभाळत त्यांनी अनेकांची प्रगती केली. सलग २५ वर्षे अध्यक्ष आणि ५१ वर्षे संचालकपदी कार्यरत राहणे हि साधी गोष्ट नाही. सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यात पहिल्यांदा सहकार चळवळ फोफावली. त्यामुळे तेथील सहकारातील नेतृत्वाने समाजाला दिशा दिली. वैकुंठ मेहता यांनी गुजरात मध्ये सहकार चळवळ वाढविली. १९०४ साली सहकार कायद्यावर आधारित पहिली सहकारी संस्था बागेवाडी येथे सुरु झाली. खेड्यापाड्यातील लोकांनी येऊन या सोसायटीची स्थापना केली.
सामान्य माणसाला संघटित करून बदल हा सहकारी चळवळीने आणला. अर्जुनराव घोरपडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्रित आणून सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. अर्जुनराव घोरपडे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी सहकाराचा आधार घेऊन सर्वसामान्यांचा उद्धार करण्याचे कार्य केले, असे विचार खास. शरद पवार यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, देशात सर्वप्रथम भाक्रा धरणासाठी लाखो एकर शेतजमीन संपादित करण्यात आली. त्यानंतर अनेक धरणे बांधली गेली. रस्त्यांचा विकास करण्यात आला. मात्र विकासाच्या नावाखाली हजारो एकर शेतजमिनी घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना आपल्या जमिनींचा त्याग करावा लागला. शेती असेल तर सर्व काही करता येते. शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकरी टिकला तरच देश टिकेल, पण आज प्रगतीच्या नावाखाली शेतजमिनी हडपण्यात येत आहेत, हि खेदजनक बाब असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, मराठा सहकारी बँक, जिजामाता सहकारी बँक या संस्थांचे पदाधिकारी, मराठा समाजातील विविध नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अप्पासाहेब गुरव यांनी आभार मानले.