बेळगाव लाईव्ह:फलाटावरून निघालेल्या रेल्वेमध्ये चढण्याच्या प्रयत्नात घसरून पडल्यामुळे फलाटावर रेल्वे सोबत फरफटत जाणाऱ्या प्रवाशाला प्रसंगावधान राखून एका रेल्वे पोलीसाने जीवदान दिल्याची घटना नुकतीच बेळगाव रेल्वे स्थानकावर घडली.
जीवदान मिळालेल्या प्रवाशाचे नांव अशोक शशीभूषण शर्मा (वय 52, रा. आर्य समाज, अगरवाल ज्वेलर्सनजीक, उत्तमनगर, पश्चिम दिल्ली) असे आहे. सदर घटनेची थोडक्यात माहिती अशी, रेल्वे क्र.17415 हरिप्रिया एक्सप्रेस गेल्या गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पुढे प्रस्थान करण्यासाठी थांबली होती.
त्यावेळी हुबळीहून कोल्हापूरला जाणारे अशोक शर्मा पाण्याची बाटली खरेदी करण्यासाठी रेल्वेतून खाली उतरले. पाण्याची बाटली खरेदी करेपर्यंत रेल्वे सुरू झाल्यामुळे शर्मा यांनी धाव घेऊन रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात ते रेल्वे डब्याच्या पायऱ्यावरून घसरले.
घसरून पडलेले शर्मा थेट चालत्या रेल्वे आणि फलाट यांच्यामधील पोकळीत अडकून फरफटत जाऊ लागले. ही बाब निदर्शनास येताच रेल्वे पोलीस दलाच्या कर्मचारी सुशील कुमार प्रसंगावधान राखून रेल्वेच्या दिशेने धाव घेत मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या शर्मा यांना फलाटावर सुखरूप बाहेर खेचून काढले. यावेळी त्यांना अन्य एका प्रवाशाचीही सहकार्य लाभले. आपले प्राण वाचवण्यात येताच अशोक शर्मा यांनी सुशील कुमार यांना शतशः धन्यवाद दिले.
रेल्वे पोलीस कर्मचारी सुशील कुमार यांनी प्रसंगावधान राखून दाखवलेले धाडस अशोक शर्मा यांचे प्राण वाचण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल फलाटावरील प्रत्यक्षदर्शींमध्ये रेल्वे सुशील कुमार यांचे कौतुक होत होते.