बेळगाव लाईव्ह:मोदी सरकारची पुणेकरांना गणेशोत्सवाची विशेष भेट.. पुण्याला मिळाली पहिली ‘वंदे भारत’ एक्सप्रेस.. या शीर्षकाखाली पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाज माध्यमांवर एक जाहिरात शेअर केली आहे. ज्यामध्ये पुणे -बेळगाव -हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 15 सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर जाहिराती उपरोक्त शीर्षकाव्यतिरिक्त पुणे -हुबळी वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरू, 15 सप्टेंबर 2024 पासून प्रवाशांच्या सेवेत. सातारा, सांगली, मिरज स्थानकावर थांबा असणार, पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता, असा तपशील नमूद आहे. ही जाहिरात लक्षात घेता असे समजते की, गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगावकरांच्या प्रतीक्षेत असलेली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे लवकरच बेळगाव मार्गे धावणार आहे.
पुणे -हुबळी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना आता वंदे भारतने जलद गतीने पुण्याला पोहोचता येणार आहे. पुणे बेंगलोर रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाची चांचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. मिरज ते कुडची या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण झाल्याने पुणे -बेंगलोर मार्गावरील विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. तसेच बेळगाव -बेंगलोर मार्गावरील वंदे भारतची चांचणी यापूर्वी घेण्यात आली आहे.
परंतु वेळेचे गणित जमत नसल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. त्यानंतर भारतीय रेल्वेने बेळगाव -पुणे मार्गावर वंदे भारत सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली होती. मागील महिनाभरापासून वंदे भारत एक्सप्रेससाठी सर्व रेल्वे स्थानकात आवश्यक बदल केले जात आहेत. हुबळीहून सकाळी 5 वाजता निघणारी वंदे भारत एक्सप्रेस बेळगावला 7 वाजता पोहोचेल.
त्यानंतर बेळगावहून पुढे मिरज, सांगली, सातारा मार्गे दुपारी 1:30 वाजता ती पुण्याला पोहोचेल. त्याचप्रमाणे पुण्याहून दुपारी 2:15 वा. हुबळीकडे निघणारी वंदे भारत एक्सप्रेस बेळगावला रात्री 8:40 मिनिटांनी पोहोचेल. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या या सेवेसंदर्भात भारतीय रेल्वे विभागाकडून अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी असून ती लवकरच होणार असल्याचे कळते.