बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईद-ए-मिलाद निमित्त होणारी मिरवणूक पुढे ढकलली होती. यामुळे रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी बेळगाव शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
हि मिरवणूक शांततेत पार पडावी, मिरवणूक काळात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी आज पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली.
रविवारी होणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलीस विभागातर्फे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याचा कुणीही प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी दिला आहे.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून मिरवणूक काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, मिरवणूक शांततेत काढण्यात यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. ज्या पद्धतीने गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पार पडली त्याचप्रमाणे हि मिरवणूक देखील शांततेत आणि सुरळीत पार पडले, असा विश्वास पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी व्यक्त केला.
ईद ए मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून केएसएआरपी, सीएसएफ, एआरएफएस, सीपीआय, एसीपी, इन्स्पेक्टर, पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड यासह इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.अशी माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी दिली.