बेळगाव लाईव्ह :मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी प्रवेश केलेला नाही, असा खुलासा कंग्राळी खुर्द येथील म. ए. समितीचे युवा कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी केला आहे
बेळगाव गोवावेस येथील मधुबन हॉटेल येथे काल सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित होते.
भारताच्या राजकारणातील गेम चेंजर मास्टरमाइंड म्हणून ओळखले जाणाऱ्या शरद पवार यांना कंग्राळी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते प्रशांत पाटील भेटायला गेले असता त्यांचा राष्ट्रवादी पक्षाचा शेला घालून शरद पवारांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
तथापी त्यानंतर प्रसारमाध्यमातून पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचा संदेश पसरविण्यात आला. हा गैरसमज प्रशांत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना उपरोक्त खुलासा केला.
ते म्हणाले की, मी महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ होतो आणि यापुढे देखील राहणार आहे. माझे प्रेरणास्त्रोत माजी आमदार कै. बी. आय. पाटील यांच्या आशीर्वादाने तसेच म. ए. समितीचे नेते आर. आय. पाटील व माजी जि. पं. सदस्या सौ. सरस्वती पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच मी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य करणार आहे. काल जो गैरसमज निर्माण झाला त्याबद्दल प्रशांत पाटील यांनी खेदही व्यक्त केला.