बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागरूक करण्यासाठी जिल्हा पंचायत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात 2022 ते 2024 या तीन वर्षात अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना शिक्षा झालेली नाही, हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तपासातील विसंगती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी चोख आणि पारदर्शक कर्तव्य बजावावे, अशा सूचना करत कार्यशाळा केवळ अत्याचारित लोकांना कायद्याची जाणीव करून देण्यापुरती मर्यादित न राहता शोषण करणाऱ्या वर्गाला कायद्याची जाणीव करून देण्यासाठी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी समाज कल्याण विभाग, एस सी एस पी आणि टीएसपी सल्लागार निवृत्त आय ए एस अधिकारी ई. व्यंकटय्या, पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह अनेक अधिकारी सहभागी झाले होते.