बेळगाव लाईव्ह : अलीकडे वाढलेली वाहतूक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वाढत असलेले अपघात यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाच्या मनात धास्ती लागून राहिली आहे. अशातच तरुणाईला लागलेले वेगाचे वेड आणि रहदारी पोलीस जणू स्वतःसाठीच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी भाग पाडत असल्याची भावना यामुळे अपघातांच्या संख्येत सर्वाधिक तरुणांचीच संख्या अधिक दिसून येत आहे.
. या सर्व गोष्टी डोळ्यादेखत घडत असूनही आज बेळगावमधील फोर्ट रोड येथील खिमजीभाई सेठ पेट्रोल पंप नजीक दुचाकीवरून चक्क चार तरुणी प्रवास करत असलेला फोटो वायरल झाला आहे.
या तरुणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या असून सुशिक्षित तरुणींकडूनच वाहतुकीच्या नियमांना अशापद्धतीने तिलांजली दिली गेली तर इतर विद्यार्थ्यांनी नेमका कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा हा प्रश्न उपस्थित राहिल्यास वावगे वाटू नये.
एका दुचाकीवरून चौघींचा चाललेला जीवघेणा प्रवास बघ्यांसाठी आश्चर्य व्यक्त करणारा तर आहेच शिवाय सुशिक्षित तरुणींकडूनच अशापद्धतीने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविल्यामुळे या तरुणी टीकेच्या धनी बनल्या आहेत.
आपली मुले उच्च शिक्षित व्हावीत, चांगल्या पदावर कार्यरत राहावीत, आपल्या मुलांचे भवितव्य सुखकर आणि सुकर व्हावे यासाठी पालक अहोरात्र मेहनत घेतात. केवळ शिक्षण न घेता आपल्या मुलांनी समाजात देखील नाव कमवावं हि अपेक्षा प्रत्येक पालक आपल्या मुलांकडून ठेवतात. मात्र घराबाहेर पडताच या सर्व अपेक्षांना तिलांजली देत कित्येक विद्यार्थी दशेतील तरुण आणि तरुणी भरकटत जातात, आणि अनेक अनुचित प्रकार याच माध्यमातून घडत जातात, हेही वास्तव आहे.
मंगळवार 24 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच दृश्य आहे ते फोर्ट रोड वरील सदर बाब लक्षात घेता तरुण – तरुणी आणि याचबरोबर पालकांनी देखील आपल्या माघारी आपली मुले काय करतात हे पडताळून पाहणे गरजेचे आहे.
आपल्या माघारी आपली मुले सुरक्षित आहेत का? याची काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय तरुण पिढीला मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये याची खबरदारी तरुणपिढीने घेणे अत्यंत गरजेचे आहे.