बेळगाव लाईव्ह :सध्या सणासुदीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादावेळी घडणारा ताटातील प्रसाद सोडून देऊन अन्नाचा अवमान करण्याचा प्रकार रोखण्यासाठी ‘इतना ही लो थाली में व्यर्थ न जाये नाली में’ अशी आदर्शवत जनजागृती नानावाडी येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आली असून जी प्रशंसेची बाब झाली आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्यामुळे दानशूर भक्तांच्या देणगीतून अथवा लोकवर्गणीतून मोठ्या भक्ती भावाने महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. अशा कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप केले जाते. मात्र या कार्यक्रमात सहभागी बरेच लोक ताटातील प्रसाद तसाच सोडून देतात आणि अन्नाचा अपमान करतात. परिणामी मोठ्या प्रमाणात अन्नाची निष्कारण नासाडी होत असते.
ही बाब खटकल्याने ‘आयुष्यात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नयेत अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण’ असे मानणाऱ्या नानावाडी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आपल्या महाप्रसादाप्रसंगी आदर्शवत जनजागृती उपक्रम राबविला.
नानावाडी गणेश मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या महाप्रसादाप्रसंगी विकास मांडेकर हे ‘इतना ही लो थाली में व्यर्थ न जाये नाली में’ हा सुविचार लिहिलेला फलक गळ्यात घालून उपस्थित गणेश भक्तांमध्ये जागृती निर्माण करताना दिसत होते.
त्याचप्रमाणे मंडळाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील प्रसादाची निष्कारण नासाडी होणार नाही याची दक्षता घेताना दिसत होते. नानावाडी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने राबविलेला हा उपक्रम प्रशंसनीय आणि लक्षवेधी ठरला होता.