बेळगाव लाईव्ह:पुणे -बेळगाव -हुबळी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे कोणत्याही तांत्रिक अडचणी विना बेळगावपर्यंत धावणार आहे. त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेऊन आता बेंगलोर -हुबळी -धारवाड वंदे भारत एक्सप्रेस सेवा धारवाड पुढे बेळगावपर्यंत वाढविण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे.
पुणे -बेळगाव -हुबळी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या आमच्या विनंतीची पूर्तता करून ही रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग आपण सुलभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 सप्टेंबर 2024 रोजी या रेल्वे सेवेचे उद्घाटन होत असून त्यामुळे कर्नाटकातील बेळगाव लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रदीर्घ प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता होणार आहे.
खरंतर सध्या बेंगलोर -हुबळी -धारवाड दरम्यान सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची यापूर्वी घेण्यात आलेली बेळगावपर्यंत चांचणी यशस्वी झाली आहे. परंतु कांही तांत्रिक कारणास्तव रेल्वे अधिकाऱ्यांनी ही रेल्वे सेवा रेल्वे सुरू करण्याचे टाळले. या कृतीला व्यापक टीकेला सामोरे जावे लागले आहे. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची पुणे -बेळगाव -हुबळी दरम्यानची चांचणी देखील यशस्वी झाली असल्यामुळे आता ही रेल्वे कोणत्याही तांत्रिक अडचणी विना बेळगावपर्यंत धावणार आहे. त्यामुळे आता सुरू असलेली या रेल्वेची बेंगलोर -हुबळी -धारवाड पर्यंतची सेवा पुढे बेळगावपर्यंत वाढवावी अशी लोकांची मागणी आहे.
याविषयी अलीकडेच फोनवरील संभाषणाद्वारे मी तुम्हाला बेंगलोर -हुबळी -धारवाड म्हणजे भारत सेवा बेळगावपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर तसेच लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपण बेंगलोर -हुबळी -धारवाड वंदे भारत एक्सप्रेस सेवा बेळगाव (कर्नाटक) पर्यंत वाढविण्याचे आदेश द्यावेत, आपला विनम्र, अशा आशयाचा तपशील खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात नमूद आहे.
खा. शेट्टर यांच्यासमोर आव्हान
उत्तर कर्नाटकासाठी मंजूर झालेले मोठमोठे प्रकल्प प्रथम आपल्याकडे घेण्याचा हुबळीचा प्रयत्न असतो, हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास आहे. त्याचप्रमाणे कोणताही तांत्रिक दोष नसताना जवळपास वर्षभरापासून वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत पोहोचण्यास होणारा विलंब होण्यास हुबळीचा विरोध कारणीभूत होता हे देखील स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जगदीश शेट्टर हे सध्या बेळगावचे खासदार असले तरी ते मूळचे हुबळीचे आहेत.
त्यामुळे सध्या वंदे भारत एक्सप्रेससह बेळगावच्या इतर मोठ्या विकास प्रकल्पांसाठी प्रयत्न करताना त्यांची ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी अवस्था होण्याची शक्यता असून हे त्यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हान असणार आहे. आता हे आव्हान ते कशा पद्धतीने पेलतात याकडे साऱ्यांचे लक्ष वेधून राहिले आहे. आता हुबळी धारवाड पासून बेळगाव पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस धावू लागला त्याचे श्रेय निश्चितपणे खासदार जगदीश शेट्टर यांना द्यावे लागणार आहे. मात्र यदाकदाचित यामध्ये कमी पडले तर त्यांच्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेला ही सामोरे जावे लागणार हे देखील तितकेच खरे आहे.