बेळगाव लाईव्ह : मागील पूर्ण आठवडा मनपाच्या भरपाई प्रकरणावरून गाजल्यानंतर आता आजीमाजी लोकप्रतिनिधींनी या प्रकरणावर जाहीरपणे प्रतिक्रिया व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे.
‘महानगरपालिका बचाव’ चळवळीची हाक देण्यात आल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक देखील जागे झाले असून अद्याप या प्रकरणाचा गुंता सुटला नसून यासंदर्भात उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनीदेखील आज प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना प्रतिक्रिया व्यक्त केली.
मनपाच्या २० कोटींच्या भरपाई प्रकरणी कोणत्याही अधिकाऱ्यांचे वेतन थकविले जाणार नाही. रस्ता रुंदीकरणासाठी झालेली भूसंपादन प्रक्रिया नियमबाह्य असून याप्रकरणी जे जे अधिकारी सहभागी आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे.
सदर प्रकरणासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रांताधिकारी कार्यालयात भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र या प्रकरणाच्या तळाशी जाऊन कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे आम. असिफ सेठ म्हणाले.
रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी असोत किंवा प्रशासकीय कर्मचारी किंवा अधिकारी अशा संदर्भात कायदेशीर प्रक्रिया होणे गरजेचे होते असेही आम. असिफ सेठ म्हणाले. मनपाला दार महिन्यात ९ कोटींचा खर्च येतो. अशातच भरपाई दिल्यानंतर मनपाच्या तिजोरीवर भार येणार आहे. मात्र तरीही कोणाचेही वेतन थांबणार नाही सरकारशी चर्चा करून निधीची सोय केली जाणार आहे.
काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी थांबविण्यात आल्याचे आरोप होत असल्याच्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार म्हणाले, कोणत्याही कारणास्तव निधी थांबणार नाही आणि विकासकामेही थांबणार नाहीत. सरकारशी चर्चा करण्यात आली असून लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीतून रस्ते, गटारी, ड्रेनेज यासारख्या नागरी सुविधांची विकासकामे राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार असिफ सेठ यांनी दिली.
शहर आणि परिसरात चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. यावर उपचार म्हणून जिल्हाधिकारी आणि डीसीपी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ज्या ज्या ठिकाणी पथदीपांची सोय नाही त्या त्या ठिकाणीच असे प्रकार घडत असल्याचे आढळून आले असून असे ब्लॅकस्पॉट शोधून त्याठिकाणी पथदीपांची सोय करण्यात येणार आहे. शिवाय गस्त देखील वाढविण्यात येणार असल्याचे आमदार असिफ सेठ यांनी सांगितले.