बेळगाव लाईव्ह :स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या भव्य श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला आज बुधवारी दुपारी अपूर्व उत्साहासह जल्लोषात भक्तीभावाने प्रारंभ झाला असून यंदा माळी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने श्रीमूर्ती विसर्जनाचा पहिला मान मिळवला.
आज अनंत चतुर्दशी दिवशी दुपारी बेळगावच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला. मिरवणुकीचा शुभारंभ नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा झाला असला तरी सर्वप्रथम माळी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे कपिलेश्वर तलावात विसर्जन झाले.
माळी गल्ली गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भक्तमंडळींनी आपली श्री गणेश मूर्ती वाजत गाजत मोठ्या जल्लोषात तलावाच्या ठिकाणी आणली.
मिरवणुकीने आणलेल्या या मूर्ती समोर सामाजिक संदेश देणारा लोकमान्य टिळकांचा हलता देखावा सादर करण्यात आला होता.
कपिलेश्वर तलावामध्ये दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात माळी गल्लीच्या गणपतीचे सर्वप्रथम विसर्जन झाले.