बेळगाव लाईव्ह:आपल्या शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्यांचा विकास करतेवेळी मोठ्या प्रमाणात कमिशन लाटण्यात आल्यामुळे आज सर्व रस्त्यांची पर्यायाने बेळगाव शहराची अधोगती झाली आहे. तेव्हा जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी खराब झालेल्या रस्त्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करून अन्यथा जनतेला उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा म. ए. समितीचे नेते व श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिला आहे.
शहरातील कपलेश्वर कॉलनी येथे खोदकामामुळे दुर्दशा झालेल्या रस्त्याच्या आपल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी आज शनिवारी ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते.
गेल्या पाच -सहा वर्षापासून कपिलेश्वर कॉलनी येथील रस्ता विकास कामाच्या नावाखाली खोदून ठेवण्यात आला आहे. यापूर्वी स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. व्यवस्थित भूसंपादन प्रक्रिया न राबवता आणि जमीन मालकांना नुकसान भरपाई न देता पलीकडच्या बाजूला गोरगरिबांची घरे पाडून जुन्या पी. बी. रोडला जोडणारा रस्ता तयार करण्यात आला.
त्या रस्त्यामुळे यापूर्वी कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर फारशी वाहतूक होत नव्हती. मात्र आता तो रस्ता बंद झाल्यामुळे सर्वजण या रस्त्याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदर रस्त्यालगतच शाळा असून नागरी वसाहत देखील असल्यामुळे वाढती रहदारी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली रस्ते व्यवस्थित करण्यात आलेले नाहीत. खोदकाम केल्यामुळे अल्पावधीत त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तेंव्हा माझी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना विनंती आहे की सदर खराब झालेले रस्ते ताबडतोब दुरुस्त केले गेले पाहिजेत. कारण हे रस्ते कोणा आमदाराच्या अथवा नगरसेवकाच्या खिशातील पैशातून झालेले नाहीत ते गोरगरिबांनी कर रुपी दिलेल्या पैशातून झालेले आहेत. शहरातील सर्व विकास कामे जनतेच्या कराच्या पैशातूनच होतात. त्यामुळे बेळगाव शहरातील खराब झालेले सर्व रस्ते आणि गटारींची लवकरात लवकर दुरुस्ती केली जावी. अन्यथा त्यासाठी उग्र आंदोलन करावे लागेल, असे कोंडुसकर पुढे म्हणाले.
बेळगाव शहराला जे स्मार्ट सिटीचे पुरस्कार मिळाले आहेत, ते अशाच निकृष्ट कामांसाठी मिळाले आहेत का? अशी शंका येते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी आणि वयस्कर नागरिकांना दुखापती होत आहेत. अपघातांचे प्रमाण वाढत असून याकडे प्रशासनाचे अथवा कोणाही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. रस्त्यांच्या विकास कामाच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. चुराडा झालेला हा पैसा गोरगरीब जनतेने भरलेल्या कराचा पैसा आहे. आपल्या शहरात स्मार्ट सिटीचे रस्ते ज्यावेळी झाले त्यावेळी मोठ्या प्रमाणात कमिशन लाटण्यात आल्यामुळे आज सर्व रस्त्यांची पर्यायाने बेळगाव शहराची अधोगती झाली आहे. बेळगाव शहराला कोणी वालीच नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. आज लोकांची होणारी हेळसांड आणि त्यांना होणारा त्रास, तसेच वाढते रस्ते अपघात याला जबाबदार कोण? असा माझा प्रशासनाला सवाल आहे. बेकायदेशीर बांधकामामुळे रस्त्यासाठीची जागा महापालिकेला परत करावी लागल्यामुळे आज सकाळी महात्मा फुले रोड पासून जुना पी. बी. रोडला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला. रस्त्यासाठी जागा देणाऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. परंतु सदर रस्त्याचे बांधकाम बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही प्रशासनाने तो रस्ता केला.
मात्र आता त्याचे दुष्परिणाम समस्त जनतेला भोगावे लागत आहेत. तेंव्हा आता ज्या ज्या ठिकाणी विकासकामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत तेथील जनतेने कोणत्याही आमदार वगैरे लोकप्रतिनिधीकडे न जाता थेट आमच्याशी संपर्क साधावा. कारण कोणताही आमदार अथवा नगरसेवक विकास कामांसाठी स्वतःच्या खिशातील पैसे देत नाहीत हे लोकांनी ध्यानात घ्यावे असे सांगून आपण सर्वजण कर भरत असल्यामुळे प्रशासनाकडून विकास कामे करून घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी स्पष्ट केले.