बेळगाव लाईव्ह : खादरवाडी येथील ‘बक्कापाचे माळ’ परिसरातील जमीन गावातील शेतकऱ्यांना पुन्हा परत मिळावी यासाठी गेल्या कांही महिन्यांपासून शेतकरी देत असलेल्या लढ्याला यश मिळाले असून एकूण जमिनीपैकी 100 हून अधिक एकर जमीन गावातील शेतकऱ्यांना परत मिळाली आहे.
बक्काप्पा वारीच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर मिळाले यश मिळाले असून शेतकऱ्यांच्या वतीने येत्या बुधवारी विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या खादरवाडी येथील बक्कापाचे माळ परिसरातील जागेचा वाद गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू होता. त्यामुळे सातत्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याने गावातील नागरिकांनी अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. कांही दिवसांपूर्वी शहर पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांच्याकडेही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बक्कापाचे माळ जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती कांही महिन्यांपूर्वी तहसीलदारांनी खादरवाडी गावाला भेट देऊन नागरिकांची मते जाणून घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
ही जमीन खादरवाडी रयतेच्या नावाने करावी असा समस्त ग्रामस्थांनी संमत केलेला ठराव त्यावेळी त्यांना देण्यात आला होता. मात्र अनेक दिवस होऊन देखील बक्कापाचे माळ व इतर भागातील जमीन शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. दरम्यान आता एकूण जमिनीपैकी 100 हून अधिक एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यासंदर्भात खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षापासून आमची श्री बक्कापाच्या देवाची जमीन वाचवण्यासाठी जी लढाई सुरू होती. त्या लढाईत आम्हाला यश आले आहे. कारण संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे आले आहेत. आमचा लढा यशस्वी करण्यामध्ये ‘बेळगाव लाईव्ह’ अग्रभागी होते, यामुळे हा लढा जिंकण्यासाठी खूप मदत झाली, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
हा लढा एका लोकप्रतिनिधी विरोधात असल्यामुळे कुणीही या लढ्यासाठी सक्षम पाठिंबा दिला नाही. मात्र बेळगाव लाईव्ह, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी, आणि श्रीराम सेना हिंदुस्थान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी खंबीरपणे साथ दिली, यामुळे हा लढा यशस्वी होऊ शकला, असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
बक्कापाचे माळ जमिनीच्या लढ्यातील विजय येत्या बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी जाहीरपणे भव्य रॅलीच्या माध्यमातून हा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. सदर जल्लोषी विजयोत्सवाला बुधवारी सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल. शेतकऱ्यांच्या या लढ्याला आलेले यश, यात सहभाग नोंदविण्यासाठी बेळगाव मधील समस्त शेतकऱ्यांसह श्रीराम सेना हिंदुस्तानच्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.