बेळगाव लाईव्ह : श्रावण महिन्यात महादेवाची आराधना केली जाते. यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आल्याने विविध शिवालयांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती. आज सोमवती अमावस्या असल्याने शिवालयांमध्ये विशेष पूजा, धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव शहरापासून साधारण १० किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात, टेकडीवर वसलेल्या कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त महाप्रसादाचे आयॊजन करण्यात आले होते
बेळगाव मधील सर्वात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन या देवस्थानाच्यावतीने दरवर्षी करण्यात येते.महाप्रसाद आयोजित करण्याचे सिद्धेश्वर देवस्थान समितीचे हे ५३ वे वर्ष असून श्रावण महिन्यातील सुरुवातीचे ५ दिवस लोकवर्गणी आणि त्यानंतर या महाप्रसादासाठी गावकरी, युवक मंडळ, देवस्थान समिती, पंच मंडळ, भक्त मंडळ तसेच समाजातील विविध दानशूर व्यक्तींकडून देणगी आणि सेवेदाखल कार्य केले जाते.
महाप्रसादाच्या आधी एक दिवस बैलगाडे गावभर फिरविण्याची प्रथा असून महाप्रसादाची पूर्वतयारी रविवारी रात्रीपासूनच केली जाते. बेळगावचा केदारनाथ अशी ख्याती असलेल्या या देवस्थानातील महाप्रसादासाठी तब्बल ४५ क्विंटल तांदूळ आणि १५ क्विंटल रवा वापरून महाप्रसाद केला जातो. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ८० ते ९० हजार भाविक विविध भागातून दाखल होतात.
आज महाप्रसादाच्या निमित्ताने देवस्थान परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. देवस्थान परिसरात पूजेचे साहित्य विक्री करणारे तसेच इतर स्टॉल्स उभारण्यात आले होते. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून या देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. चारही सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
परंपरेनुसार करण्यात आलेल्या या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बेळगाव शहरासह कलखांब, मुचंडी, चंदगड, अष्टे, सुळेभावी, बाळेकुंद्री खुर्द, सांबरा, मुतगा, निलजी, बसवण कुडची, काकती, होनगासह तालुक्यातील व परगावचे भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.