बेळगाव लाईव्ह : जिल्हा पंचायत सभागृहात आज जिल्हास्तरीय बँकर्स बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या बँकांच्या अधिकाऱ्यांनि शासन पुरस्कृत योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. ग्रामीण भागात बँक शाखा सुरू करण्यात याव्यात. पुढील प्रगती आढावा बैठकीत शासकीय प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बँकांमध्ये प्रलंबित असलेल्या शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती लवकरात लवकर तपासावी, पुढील कार्यवाही करावी आणि शेतकरी व अनुसूचित जाती-जमातींच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बेळगाव जिल्हा हा कृषी आधारित जिल्हा असल्याने शेतकऱ्यांना कर्ज देताना उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी बैठकीत उपस्थित सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना केले.
अनुसूचित जाती-जमातीच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेकडून कर्ज काढताना येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती बैठकीत सांगितली व भविष्यात अशा समस्यांची पुनरावृत्ती होऊ नये, अशा सूचनाही केल्या.
यावेळी सुरेश पै यांनी पहिल्या तिमाहीचा अहवाल सादर केला. या बैठकीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी पी. बिस्वास, नाबार्डचे डीडीएम अभिनव यादव, बेळगाव जिल्ह्यातील सर्व बँकर्सचे प्रतिनिधी, सरकारी विभागांचे प्रमुख, शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे नेते उपस्थित होते.