बेळगाव लाईव्ह :’ईक्षण ॲप्लीकेशन’ हे मेंदूला जोडलेल्या डोळ्यांच्या नसांना टप्प्याटप्प्याने उत्तेजन देऊन त्यांना बळकट करत असल्यामुळे सदर ॲप मतिमंद मुलांसाठी निश्चितपणे वरदान ठरणार आहे असा विश्वास व्यक्त करून सदर ॲप मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून लवकरच मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील नेत्रतज्ञ डाॅ. स्मिता प्रभू यांनी दिली.
नेत्रतज्ञ डाॅ. स्मिता प्रभू यांनी विकसित केलेल्या ‘ईक्षण ॲप्लीकेशन’चे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये डॉ. स्मिता प्रभू बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, ‘ईक्षण’ हे एक अँड्रॉइड फोन, स्मार्टफोन, लॅपटॉप मधील वापरकर्ता अनुकूल (यूजर फ्रेंडली) ॲप्लीकेशन आहे. हे ॲप प्रामुख्याने मतिमंद मुलांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण डोळे अतिशय चांगले असले तरी त्यांच्या मेंदूत बिघाड असतो.
डोळ्याचे संदेश त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जर मेंदूचा विकास झाला नाही तर त्याचा त्रास मुलासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो. मतिमंद मुलांच्या डोळ्याचे महत्व बऱ्याच जणांना कळालेले नाही. त्या मुलांचे पालक आपल्या मुलाच सुधारणा व्हावी यासाठी त्याच्यावर फिजिओथेरपी वगैरे सर्व प्रकारचे उपचार करतात आणि त्यामध्ये बराच कालावधी गेल्यानंतर शेवटी डोळ्याची तपासणी करून घेतात. खरंतर डोळ्यांमुळे मतिमंद मुलांच्या मेंदूचा 70 टक्के विकास होऊ शकतो. हा विकास साधण्यासाठी मतिमंद मुलांच्या मेंदूला जोडलेल्या डोळ्याच्या नसा डोळ्याचे व्यायाम करून बळकट करणे हा एकमेव उपाय आहे. आम्ही ईक्षण हे ॲप्लीकेशन त्यासाठीच बनवले आहे.
ईक्षण ॲपच्या माध्यमातून मेंदूला जोडलेल्या डोळ्यांच्या नसांना टप्प्याटप्प्याने उत्तेजन (स्टीम्युलेशन) दिले जाते. अतिशय मतिमंद असलेल्या मुलांवर अगदी पहिल्या टप्प्यात उपचार करावे लागतात. हे स्टीम्युलेशन म्हणजे त्यांना फक्त कृष्णधवल रंगछटा आणि आकार दाखवले जातात. त्यानंतर प्राणी, दाखवणे संगीतासह अन्य आकृत्या दाखवणे अशी खूप प्रकारची स्टिम्युलेशन्स असतात.
पहिल्या टप्प्यात हे उपचार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विविध रंगांचे स्टिम्युलेशन दिले जाते. त्यानंतर ईक्षण ॲपच्या माध्यमातून संबंधित मुलांच्या हात आणि डोळे यांच्यात समन्वय (हॅन्ड आय कॉर्डिनेशन) साधण्यास मदत केली जाते. आपल्याला मोबाईल घे असे सांगितले की आपण तो पटकन घेतो परंतु मतिमंद मुलांना मोबाईल म्हणजे काय हे आधी कळावं लागतं. त्यानंतर तसा संदेश मेंदूकडे जावा लागतो आणि मेंदूने आदेश दिल्यानंतर मोबाईल उचलण्याची क्रिया घडू शकते. हे सर्व टप्प्याटप्प्याने घडते आणि त्यासाठी आमचे ॲप सहाय्य करत असल्यामुळे मतिमंद मुले ईक्षण ॲप वापरून नेमक्या वस्तू उचलण्याच्या कृती सुलभरित्या करू शकतात, असे डॉ. प्रभू यांनी स्पष्ट केले
विशेष म्हणजे सध्याच्या घडीला आम्ही निर्माण केलेल्या ॲप सारखे ॲप जगभरात कोठेही नाही. ॲपल कंपनीचे मतिमंद मुलांसाठी कांही ॲप आहेत, मात्र ते खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसते. याखेरीज जे ॲप्स उपलब्ध आहेत त्यापैकी बहुदा कोणतेही ॲप फुकट अथवा मोफत नाही. ईक्षण ॲप हे अँड्रॉइड फोन स्मार्टफोन लॅपटॉप वगैरे कोणत्याही माध्यमातून तुम्हाला वापरता येऊ शकते. ईक्षण ॲप पूर्णपणे तयार असून आम्ही ते आता पेटंटसाठी सादर केले आहे. पेटंट मिळताच आम्ही ते प्ले स्टोअरमध्ये घालणार आहोत. प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असणारे ईक्षण ॲप विनाशुल्क कोणीही वापरू शकणार आहे. सध्या मी या ॲपचा वापर सुरू केला असून माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या मोबाईलमध्ये ते डाऊनलोड करून देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांनी ते वापरण्यासही सुरु केले आहे. याआधी आम्ही या ॲपचे किट तयार केले होते जे खरेदी करावे लागत होते आणि ही बाब सर्वच पालकांना परवडणारी नव्हती. या ॲपची संकल्पना माझी स्वतःची असून केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या डीन डाॅ. मिना आणि त्यांचे विद्यार्थी यांच्या सहकार्याने मी ती प्रत्यक्षात उतरवली. माझ्या पीएचडीच्या काळात मी असे बरेचसे प्रकल्प केले असून त्यावरून स्टीम्युलेशनद्वारे मतिमंद मुलांमध्ये सुधारणा होते हे सिद्ध झाले आहे. मात्र त्यावेळी आत्ता इतके प्रगत तंत्रज्ञान नव्हते परंतु आता स्टिम्युलेशन देणारे आमचे ॲप मतिमंद मुलांना अधिक सक्षम करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी ठरणार आहे. गरीब पालकांची आपल्या मतिमंद मुलांच्या उपचाराच्या बाबतीत होणारी परवड लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून यासंदर्भात मी नियोजन करत आले आहे.
ज्याला योगायोगाने केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीची साथ लाभली. या ॲपची निर्मिती करणे ही खूप कठीण गोष्ट आहे खुद्द डोळ्यांचे डॉक्टर आणि बालरोग तज्ञांसाठी देखील ही संकल्पना नवी आहे. एकंदर मतिमंद मुलांसाठी आमचे ईक्षण ॲप निश्चितपणे वरदान ठरणार आहे, असा विश्वास डॉ. स्मिता प्रभू यांनी शेवटी व्यक्त केला.