बेळगाव लाईव्ह : काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. देव तारी त्याला कोण मारी.. या म्हणींचा प्रत्यय आज गुरुवारी कपिल तीर्थ तलावाजवळ आला आहे केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचा जीव वाचलाय
श्री गणेशोत्सवाचा शुभेच्छा बॅनर लावत असताना अनावधानाने टी सी च्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श होऊन विजेचा धक्का बसल्यामुळे एका जाहिरात एजन्सीचे दोन कामगार किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी कपिलेश्वर तलाव परिसरात घडली. दैव बलवत्तर म्हणून दोन्ही कामगार बचावले असले तरी सदर घटना श्री गणेशोत्सव काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे याचे महत्त्व विशद करते.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळपासून त्या जाहिरात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा बॅनर आणि फलक लावण्याचे काम हाती घेतले. सदर घाईगडबडीचे फलित म्हणजे दोघा जणांना विजेचा जबर झटका सहन करून जखमी व्हावे लागले. सकाळी जुन्या कपिलेश्वर तलाव येथे जाहिरात एजन्सीचे दोघे कामगार उंचावर चढवून बॅनर लावत होते.
बॅनर लावण्याची घाई असल्यामुळे त्यांचे तेथे जवळच असलेल्या विजेच्या तारेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी दोघांना विजेचा धक्का बसला. सदर प्रसंग जीवावर बेतणारा होता, तथापि दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. संबंधित दोघाही कामगारांच्या जीवाला धोका न होता ते किरकोळ जखमी होण्यावर निभावले.
दरम्यान, सदर घटनेमुळे श्री गणेशोत्सव काळात प्रत्येकाने सावधानता बाळगणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट होते. हेस्कॉमने यापूर्वीच म्हणजे पावसाळ्याला सुरुवात होत असताना विजेशी संबंधित दुर्घटना टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत जाहीर मार्गदर्शन केले आहे.
त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे. श्री गणेशोत्सव काळात वरील प्रमाणे घटना घडू नये याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कपिलेश्वर तलाव येथील उपरोक्त घटनेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारीसह कोणत्याही दुर्घटनेमुळे सणाच्या आनंदाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे हे प्रत्येक शहरवासीयाचे कर्तव्य असल्याचे मत जाणकारातून व्यक्त होत आहे.