Wednesday, January 8, 2025

/

बेळगावच्या ऐतिहासिक श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषी प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर अशा जयघोषासह फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा आणि अन्य वाद्यांचा दणदणाट अशा जल्लोषी वातावरणात बेळगावच्या ऐतिहासिक श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला आज मंगळवारी दुपारी नरगुंदकर भावे चौक येथून भक्तीभावाने अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला.

परंपरेनुसार शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे आज अनंत चतुर्दशी दिवशी दुपारी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगाव आणि श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शुभारंभाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सविता कांबळे, शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, भाजप नेते महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त येडा मार्टिन मार्बन्यांग, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

नियोजित वेळेपेक्षा थोड्या उशिरा सुरू झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी श्री गणेश महामंडळांच्यावतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सेठ, जिल्हाधिकारी रोशन, माजी आमदार बेनके, कवटगीमठ आदींनी समायोजित विचार व्यक्त करून श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच विसर्जन मिरवणूक कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पाडण्याचे आवाहन सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसह समस्त गणेश भक्तांना केले.

त्यानंतर शहराच्या प्रथम नागरिक महापौर सविता पाटील यांच्या हस्ते श्री गणरायाच्या मूर्तीचे पूजन आणि आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर आमदार असिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, जि. पं. सीईओ शिंदे आदींनी ढोल वादन करून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला चालना दिली. सदर शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी भावे चौकात गणेश भक्तांची एकच गर्दी झाली होती.

आजचा अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे भक्ती, चैतन्य आणि मांगल्य यांचे प्रतीक असलेल्या बुद्धी देवता, विघ्नहर्ता श्री गणरायाला निरोप दिवस. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आज दुपारनंतर विसर्जन मिरवणूक मार्ग गणेश भक्तांनी फुलू लागला होता. शहरातील गल्ल्यांसह उपनगरातील श्री सार्वजनिक गणेश मूर्ती फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणुकीने वाजत गाजत मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी नरगुंदकर भावे चौकाच्या दिशेने प्रस्थान करताना दिसत होते. एकंदर श्री विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्ग उत्साहाने सळसळताना दिसत होता.

मिरवणुकीचा आनंद व्यवस्थित लुटता यावा यासाठी अनेक गणेश भक्तांनी दुपारनंतर लवकर येऊन मोक्याच्या जागा पकडल्या होत्या. धर्मवीर संभाजी महाराज चौक (बोगारवेस) येथे महापालिका प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीमुळे बहुसंख्य गणेश भक्तांची विशेष करून लहान मुले आणि महिलांची चांगली सोय झाल्याचे दिसत होते. श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्याबरोबरच आवश्यक सर्वती खबरदारी घेतली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.