बेळगाव लाईव्ह : संकेश्वर येथील निडसोशी मठाच्या खाजगी जागेत सुरु असलेल्या एपीएमसी मार्केटचे स्थलांतर सरकारी जागेत करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन घेऊन आज कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, गेल्या २० वर्षांपासून निडसोशी मठाच्या खाजगी जागेत एपीएमसी मार्केट सुरु आहे. याठिकाणी एजंटराज सुरु असून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करण्यात येत आहे. गेल्या २० वर्षांपासून शेतकऱ्यांचे शोषण सुरु असून सदर एपीएमसी खाजगी जागेतून सरकारी जागेत स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
याचप्रमाणे या परिसरातील शेतकऱ्यांना हेस्कॉमकडून केवळ अडीच तास थ्री फेज वीजपुरवठा केला जात असून रात्रीच्यावेळी वीजपुरवठा करण्यात येत नाही. यामुळे पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. पावसाने आणि दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आजवर सत्तेत आलेल्या कोणत्याही सरकारने दिली नाही, शिवाय येथील खाजगी जागेतील एपीएमसीमुळे एजंटांचे खिसे भरत असून शेतकरी मात्र तोट्यातच जगत आहेत.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून मागण्या मांडल्या असून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार आणि शेतकरी नेते चोन्नप्पा पुजारी यांनी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द करण्यापूर्वी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. पिकांचे नुकसान, पीक विमा भरपाई वाटपात दिरंगाई आणि संकेश्वर मधील खाजगी जागेत सुरु असणाऱ्या एपीएमसी संदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकरी सहभागी झाले होते.