बेळगाव लाईव्ह : तिलारी पाणलोट क्षेत्रातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीला जोडण्यासंदर्भात आणि बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलीनीकरणासंदर्भात माजी नगरसेवक संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
तिलारीचे पाणी मार्कंडेयाला जोडण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाशी चर्चा करू अशी आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले.
माजी नगरसेवकांच्या संघटनेने रविवारी सरकारी विश्रामगृहात खासदार शेट्टर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवकांनी मार्कंडेय नदीपात्रात तिलारी जलाशयाचे पाणी आणल्यास बेळगावचा पाणीप्रश्न निकालात निघेल, असे सांगून त्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले. त्यावर महाराष्ट्र जर आपल्याला पाणी देत असेल तर त्यासाठी आपण महाराष्ट्राचे आमदार आणि मंत्र्याशी चर्चा करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले.
यावेळी कॅण्टोन्मेंट बोर्डाचा काही भाग महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत आता हालचाली होत आहेत याबाबत 1985 सालीच बेळगाव महापालिकेने ठराव केला आहे. त्यामध्ये कोणता भाग घ्यावा, उपाययोजना कोणत्या कराव्यात, याबाबत निर्णय झाला असल्याचे सांगून त्यावेळच्या ठरावाची प्रत खासदारांना देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील अरगन तलाव हा शहरातील जनावरांच्या पाण्यासाठी आणि धुण्यासाठी राखीव आहे. तशी नोंद मुंबई प्रांतात बेळगाव असल्यापासूनची आहे. त्यामुळे याबाबतही निर्णय घेवून अरगन तलावात घालण्यात आलेली बंदी हटवावी अशी मागणी केली.
यावेळी खासदार शेट्टर यांनी आपण शहराच्या विकासासाठी रिंग रोड, बायपास, उड्डाणपूल, बेळगाव-हुबळी रेल्वे मार्ग यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. वरिष्ठ पातळीवर याबाबत हालचाली सुरू आहेत, अशी माहिती दिली.
यावेळी माजी आमदार रमेश कुडची, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, वंदना बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, दीपक वाघेला, संजीव प्रभू आदी उपस्थित होते.