बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सव काळातच होणार असलेल्या ईद-ए-मिलाद सणाची मिरवणूक बेळगावमध्ये आठवडाभर पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी घेतला असून सदर मिरवणूक आता येत्या सोमवार दि 16 सप्टेंबर ऐवजी रविवार दि 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.
शहरातील अंजुमन इस्लाम सभागृहामध्ये काल शुक्रवारी झालेल्या विविध मुस्लिम संघटनांचे प्रमुख, धर्मगुरू आणि मुस्लिम बांधवांच्या बैठकीत उपरोक्त निर्णय एकमताने घेण्यात आला. यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू शेठ यांनी विशेष पुढाकार घेतला होता आमदार शेठ यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या माध्यमातून बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी धार्मिक सलोख्याचे एक नवे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
गणेशोत्सव काळातच ईद-ए-मिलाद हा सण आल्यामुळे जिल्हा व पोलीस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण झाले होते. त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात होते. मात्र आता समस्त मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद मिरवणूक लांबणीवर टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. काल झालेल्या बैठकीत सिरत कमिटी, अंजुमन इस्लाम यांच्यासह आमदार सेठ, मुफ्ती मंजूरअहमद रिझवी, हाफिज नजीरूरला खादरी, सरदार अहमद मुस्ताक नईम अहमद यांच्यासह अनेक धर्म गुरु, मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी आणि मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
बैठकीतील निर्णयाअंती आमदार असिफ (राजू) सेठ यांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्याची जाहीर घोषणा केली. ईदच्या एक दिवसानंतर श्री गणेश विसर्जन मिरवणूक होणार आहे. एक दिवसाआड होणाऱ्या दोन मिरवणुकांमुळे साहजिकच प्रशासन व पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन ईदची मिरवणूक पुढे ढकलण्यात आली असून या निर्णयाचे शहरातील सर्व थरात स्वागत होत आहे.
काल बैठकीनंतर बेळगाव जिल्हा सिरत कमिटीच्यावतीने प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका धर्मगुरूंनी अंजुमन -ए -इस्लामचे प्रमुख व बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुस्लिम समाजातील सर्व धर्मगुरू प्रमुख नेते आणि युवकांसह समस्त मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद सणाच्या मिरवणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आज झालेल्या बैठकीत सर्वांगाने सखोल चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला आहे की 16 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी ईदची मिरवणूक शहरातील श्री गणेशोत्सवाचे पर्व लक्षात घेऊन रविवार दि 22 सप्टेंबर रोजी काढण्यात येईल.
सदर मिरवणुकीला शहरातील फोर्ट रोड येथील जिना चौकातून सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल. आणि प्रमुख मार्गावरून फिरून मिरवणुकीची सांगता कॅम्प येथील असदखान दर्गा येथे होईल असे सांगून समस्त मुस्लिम बांधवांनी याची नोंद घेत सहकार्य करावे आणि ईद मिरवणूक अतिशय शांततेत पार पाडावी असे आवाहन धर्मगुरूंनी केले.
आमदार असिफ (राज सेठ यांनी यावेळी बोलताना सिरत कमिटी, अंजुमन -ए -इस्लाम यांच्यासह आम्हा सर्व मुस्लिम बांधवांची आज बैठक झाली. या बैठकीत समाज प्रमुख धर्मगुरू आणि आमच्या बांधवांनी आपापली मते मांडली त्यानंतर सांगोपांग चर्चा होऊन ईद-ए-मिलादची मिरवणूक 22 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला ईद ची नमाज 15 सप्टेंबर रोजी रात्री होईल त्यानंतर वेळेचे महत्व लक्षात घेऊन 22 रोजी सकाळी दहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ होऊन मिरवणुकीचा सांगता समारंभ असद खान दर्गा शरीफ येथे होईल.
आपल्याला व इतरांनाही त्रास होऊ नये यासाठी सर्वांनी ही मिरवणूक बंधुत्व आणि शांतता अबाधित राखून पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार सेठ यांनी केले.