बेळगाव लाईव्ह :रामलिंग गल्ली, जुने बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ यंदा आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून या निमित्ताने सदर मंडळातर्फे आकर्षक श्री गणेश मूर्ती स्पर्धेसह येत्या शनिवार दि. 14 आणि रविवार दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता जुने बेळगाव, वडगाव, खासबाग व शहापूर परिसर मर्यादित मंडळांसाठी भव्य खुल्या सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रामलिंग गल्ली, जुने बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले 25 व्या वर्षे पूर्ण करत आहे. मंडळाचा हा रौप्य महोत्सव मंडळाचे आधारस्तंभ अमर बाळेकुंद्री यांच्या पुढाकाराने भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने आकर्षक श्री गणेश मूर्ती स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या आकर्षक सार्वजनिक श्री गणेश मूर्तींना अनुक्रमे 51,000, 31,000 आणि 21,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याखेरीज स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना आकर्षक पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भव्य खुली सांस्कृतिक नृत्य स्पर्धा देखील आयोजित केली जाणारा असून ही स्पर्धा येत्या 14 व 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रामलिंग गल्ली जुने, बेळगाव येथे होणार आहे. स्पर्धा सामूहिक नृत्य (ग्रुप डान्स) आणि एकाकी नृत्य (सोलो डान्स) अशा दोन प्रकारात घेतली जाईल.
ग्रुप डान्स स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 21000 15000 आणि 10,000 रुपयांचे बक्षीस तर सोलो डान्स प्रकारातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 15,000 10,000 आणि 7,500 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सदर स्पर्धांसाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार असले तरी हे शुल्क विधायक कार्यासाठी वापरले जाणार आहे हे विशेष होय.
प्रवेश शुल्काच्या स्वरूपात जमा झालेली सर्व रक्कम रामलिंग गल्ली, जुने बेळगाव सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळातर्फे मंडळाचे आधारस्तंभ अमर बाळेकुंद्री व तुळशीदास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनाथालय अंध मुलांच्या शाळेला देणगी दाखल देण्याचा आदर्शवत उपक्रम राबवला जाणार आहे.
गेल्या 25 वर्षापासून रामलिंग गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याबरोबरच हे मंडळ गेली 25 वर्षे सामाजिक बांधिलकीही जोपासत आहे.
त्या अनुषंगाने मंडळाकडून दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जात असते. यावेळी नृत्य स्पर्धेतील प्रवेश प्रवेश शुल्काचा सदुपयोग अनाथ व अंध मुलांसाठी करण्याचा निर्णय घेऊन सदर मंडळाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. श्रीमूर्ती आणि नृत्य स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी यश (7411148557) किंवा आशिष (8951912011) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.