Thursday, January 2, 2025

/

खुद्द शहरातील ‘या’ गल्लीत नागरी समस्यांचा कहर; रहिवाशी संतप्त!

 belgaum

बेळगाव लाईव्ह:स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कपिलेश्वर उड्डाणपूला खालील पाटील गल्ली व तहसीलदार गल्ली यांच्यामध्ये असलेल्या गल्लीमध्ये खराब रस्ता, तुंबलेल्या गटारी, ड्रेनेज, बंद असलेले पथदीप अशा नागरी समस्यांचा कहर झाल्यामुळे स्थानिक रहिवाशात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 9 मधील पाटील गल्ली व तहसीलदार गल्ली या दोन गल्ल्यांमध्ये असलेल्या गल्लीमधील रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. महापालिकेकडून साफसफाई केली जात नसल्यामुळे कचरा साचून अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच येथील गटारी आणि ड्रेनेज कायम तुंबलेले असतात.

त्यामुळे गल्लीतील नागरिकांच्या विशेष करून लहान मुले व वयस्कर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. चांगली बोअरवेल अर्थात कुपनलिका नसल्यामुळे गल्लीतील नागरिकांना सातत्याने पाण्याची समस्या भेडसावत असते.या खेरीज या गल्लीतील पथदीप महिन्यातून एकदा कधीतरी एकदा पेटत असल्यामुळे ते असून नसल्यासारखे आहेत.

या सर्व समस्या संदर्भात स्थानिक नगरसेविका पुजा इंद्रजीत पाटील आणि महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा येथील संतप्त रहिवाशांचा विशेष करून महिलावर्गाचा आरोप आहे. तसेच आपल्या गल्लीतील सदर समस्यांकडे लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे तात्काळ निवारण करावे, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे.Womens

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना जयश्री पाटील या गृहिणीने सांगितले की,गेल्या 5 -6 वर्षापासून आमच्या भागातील ड्रेनेज आणि रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यानुसार ड्रेनेचे काम करण्यात आले असले तरी रस्त्यांचे काम अद्यापपर्यंत झालेले नाही. गल्लीतील दुर्दशा झालेल्या रस्त्यांमुळे गेल्या 5 वर्षापासून आम्हाला त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात आमच्या नगरसेविकेकडे तक्रार केल्यास त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. निवडून आल्यापासून या नगरसेविका नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकदाही आमच्या गल्लीकडे फिरकलेल्या नाहीत. त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे आमचा रस्ता तर खराब आहेच भरीसभर गटारी आणि ड्रेनेज तुंबले असून आम्हाला अस्वच्छ दुर्गंधीयुक्त वातावरणात रहावे लागत आहे. महापालिकेची कचरा गाडी देखील आत गल्लीमध्ये येण्याऐवजी बाहेर रस्त्यावर थांबते. कचरा गाडीत आत येत नसल्यामुळे घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण होत असते. एकंदर आमच्या येथील घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गटारी, ड्रेनेज मोठ्या प्रमाणात तुंबून राहत आहे. घरातील केरकचरा टाकण्याची सोय उपलब्ध नाही. आमच्यासाठी पाण्याचीही चांगली सोय नाही. या भागातील प्रत्येक गल्लीमध्ये दोन दोन बोअरवेल आहेत, आमच्या गल्लीत मात्र एकही चांगली बोअर नाही. पूर्वीची एक बोअर मारण्यात आली असली तरी ती थेट गटारीतच आहे. या पद्धतीने बोअर मारल्यास जनतेला त्रास होऊ शकतो. सांडपाणी वाहणाऱ्या गटारीतील बोअरचे पाणी लोक कसे काय वापरतील? असा साधा विचार देखील लोकप्रतिनिधी, अधिकारी व कंत्राटदाराने केलेला नाही. त्या बोअरचे पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे आजाराला निमंत्रण देणारे ते पाणी आम्ही कसे वापरायचे? त्यामुळे गल्लीतील ती बोअरवेल असून नसल्यासारखी आहे. लोकप्रतिनिधी चार -चारदा येथे येतात आणि प्रसिद्धीसाठी कुदळ मारून जातात. प्रत्यक्षात जनहिताचे काम मात्र करतच नाहीत. रस्त्यावरील महापालिकेचे पथदिपदेखील महिन्यातून कधीतरी एकदा लागतात उर्वरित काळात बंदच असतात. वारंवार तक्रार करून देखील आमच्या समस्यांची कोणीच दखल घेत नाही. अनंत चतुर्दशी काळात तीन दिवस गल्लीत लाईट नसल्यामुळे अंधार होता. या अंधारात रस्त्यावरील खाचखळग्यात ठेचाळून पडून अनेक जणांना दुखापत झाली असल्याचे जयश्री पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी जयश्री पाटील यांच्यासह उपस्थित महिलांनी बेळगाव स्मार्ट सिटी योजनेवर जोरदार टीका केली. बेळगाव स्मार्ट सिटी झाली म्हणतात परंतु आमचा भाग आहे तसाच आहे. हनुमाननगर, आयोध्यानगर वगैरे बाहेरच्या भागांमध्ये स्मार्ट सिटीची विकास कामे केली जात आहेत ती कामे आमच्या येथे केंव्हा होणार? शहरात असूनही प्रशासन व स्मार्ट सिटी लिमिटेड आमच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. असे झाले तर आमच्या भागाचा विकास कधी होणार? नगरसेवक तर येथील समस्यांकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसतात असा आरोप करून येथे नेमलेल्या महिला सफाई कर्मचारी तर काहीच काम करत नाहीत, असे जयश्री पाटील व अन्य महिलांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.