Friday, November 15, 2024

/

आता मनपा कंत्राटदार संपावर जाण्याच्या विचारात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिलं वर्ष -दीड वर्ष झाले थकित असून सदर बिलं तात्काळ अदा केली नाही तर येत्या महिन्याभरात आम्ही सर्व कंत्राटदार संपावर जाण्याचा विचार करत आहोत, अशी माहिती बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटना आणि महानगरपालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी दिली.

बेळगाव महानगरपालिका आवारात आज मंगळवारी सकाळी पद्मनावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि अधीक्षक अभियंत्यांकडे आपल्या थकीत बिलांची मागणी करण्यासाठी तसेच विविध समस्या मांडण्याकरिता आज सकाळी पालिकेचे बहुसंख्य कंत्राटदार महापालिका आवारात जमले होते.

या सर्वांच्यावतीने बोलताना कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी सांगितले की, आम्ही आज महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना भेटणार होतो. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून आमची बिले प्रलंबित आहेत. वार्ड बजेटचे पैसेही मिळालेले नाहीत. 15 फायनान्सचे पैसे मागील वर्षी मिळाले नव्हते ते गेल्या आठवड्यात देण्यात आले आहेत. आमचे एएमडी आणि एसडी हे देखील प्रलंबित आहेत. यासंदर्भात तसेच आम्हा कंत्राटदारांच्या अन्य कांही समस्या आहेत, त्या संदर्भात आज आम्ही मनपा आयुक्त आणि अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करणार होतो. मात्र हे उभयता आज कार्यालयात आले नसल्यामुळे आम्ही उद्या किंवा परवा त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत.City corporation contractors

जनरल वॉर्ड बजेट आणि महात्मा नगर योजनांचे कामे करून आता वर्ष होत आले तरी त्याचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. महात्मा नगर योजनेची 25 कोटींची बिले आणि महानगरपालिकेची 5 ते 6 कोटींची बिले थकीत आहेत. ही बीलं तात्काळ अदा केली जावीत अशी अशी आमची मागणी आहे. बिले त्वरित अदा करण्याबरोबरच आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर येत्या महिन्याभरात संपावर जाण्याचा विचार आम्ही करत आहोत.

इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्येच कंत्राटदारांच्या बिलांची खूप समस्या आहे. फक्त बेळगाव नव्हे सर्वच महापालिकांमध्ये ही समस्या आहे असे सांगून त्यामुळे आमची राज्य आणि जिल्हा कंत्राटदार संघटना संप पुकारण्याचा विचार करत आहे, असे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.