बेळगाव लाईव्ह :जंगले, जैवविविधता, जलप्रणाली आणि मानवाची अखंडता राखण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वत रांगांची देखभाल करून त्या टिकवणे गरजेचे आहे. म्हादई नदीचे पात्र भीमगड आणि मडेई वन्यजीव अभयारण्यापासून दूर वळवल्यास 500 चौ.कि.मी जंगलांवर विपरित परिणाम होऊन उत्तर कर्नाटकाचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही, असे मत ‘पर्यावरणासाठी आम्ही’ संघटनेचे सदस्य कॅप्टन नितीन धोंड यांनी व्यक्त केले.
कर्नाटक विद्यावर्धक संघ धारवाड येथे गेल्या 8 व 9 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन दिवशी बैठकीप्रसंगी ते बोलत होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे अस्तित्व टिकवून ठेवणारी भूमिका हा बैठकीतील चर्चेचा मुख्य विषय होता. राज्यभरातील उपस्थितांसमोर मलप्रभा नदीची केस स्टडी सादर करताना कॅ. नितीन धोंड यांनी या प्रदेशात पाऊस, पाणी आणण्यात खानापूर तालुक्यातील लगतच्या जंगलांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेबाबत हवामानशास्त्र समजावून सांगितले.
खानापूरच्या पाणलोट क्षेत्रातल्या वनांच्या अखंडतेवर मलप्रभा नदी अवलंबून आहे. या परिसरात वन्यप्राणी वनस्पती यांच्या दुर्मिळ प्रजाती आहेत अधिक अधिक पाऊस तसेच मलप्रभा नदीमुळे तालुक्यातील लोकांचे जीवन आणि उपजीविका टिकून आहे उत्तर कर्नाटकाचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी प्रस्तावित पायाभूत प्रकल्प जंगलतोड जमिनीच्या वापरातील बदल आणि अवैज्ञानिक कृषी पद्धतीमुळे उगमस्थान असलेल्या खानापूरच्या जंगलांना दोन प्रमुख नदी प्रणालींचा नाश होण्याचा धोका आहे.
कोणत्याही छेडछाडीमुळे त्यांचे विखंडन आणि नुकसान या प्रदेशाच्या जल सुरक्षेवर परिणाम करेल आणि संपूर्ण उत्तर कर्नाटक प्रदेशातील हवामान आणि पर्जन्य चक्राला कालांतराने नष्ट करेल, असे मत कॅप्टन नितीन धोंड यांनी व्यक्त केले. खानापूर तालुक्यात पावसामुळे रेणुकासागर धरणात 85 टक्के पाणी साठा होतो यामध्ये खानापूरच्या पश्चिमेकडील पश्चिम घाटातील जंगले 40 टक्के पावसाचे योगदान देतात. म्हादई नदीचे पाणी भीमगड आणि मडेई वन्यजीव अभयारण्यापासून दूर वळवल्यास 500 चौ.कि.मी जंगलांवर विपरित परिणाम होईल.वन्यजीव अभयारण्यांचे नुकसान झाल्याने खानापूरमधील पावसात कमालीची घट होऊन रेणुकासागर धरणामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. या जंगलांशी छेडछाड केल्याने उत्तर कर्नाटकचे वाळवंटीकरण होईल, असे कांही ठळक मुद्देही त्यांनी मांडले.
ॲड. गौरोजी यांनी 2003 पासून नदीकाठावरील अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या रामदुर्गच्या डॉ. पौर्णिमा गौरोजी यांच्या नदी संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. पाणी अर्थ फाउंडेशन बेंगलोरच्या निर्मला गौडा यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले. दोन दिवशीय बैठकीमध्ये अवैज्ञानिक मानवकेंद्री विकासात्मक उपक्रमांमुळे पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय अखंडतेशी तडजोड केली जात आहे. यामुळे केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात गेल्या कांही वर्षांत प्रत्येक पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीनां तोंड द्यावे लागत आहे.
वायनाड ही सर्वात अलीकडील शोकांतिका आहे. जैव-विविधता, जल सुरक्षा, पर्यावरणीय अखंडता यासह पश्चिम घाटाला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (ईएसए) दर्जा देण्याच्या सहाव्या प्रारूप अधिसूचनेसह संबंधित अन्य विषयांवर चर्चा झाली. बैठकीस वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, विचारवंत, पर्यावरणवादी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.