बेळगाव लाईव्ह : बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावरून जा ये करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा भव्य रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा ७ गावच्या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि येथील रहिवाशांनी दिला आहे.
आज हिंडलगा, उचगाव, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, बाची आणि सुळगा अशा ७ ग्रामपंचायतींचे अध्यक्ष – उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.
या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून येत्या १५ दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर भव्य रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यासंदर्भात मनोज पावशे यांनी सांगितले, कि या रस्त्यावरून वाहनेच नव्हे तर पादचाऱ्यांनाही जाण्यायेण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. या रस्त्याच्या पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही भेट दिली असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
संपूर्ण शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या घंटा गाड्या याच मार्गावरून तुरमुरी कचरा डेपोला जातात. यासह या रस्त्याला जोडणाऱ्या अनेक गावातील नागरिक देखील दररोज ये जा करतात. यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने त्यांनी केली.
हिंडलगा ग्रामपंचायतीचे सदस्य डी. बी. पाटील बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील सावंतवाडीला जोडणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. याचप्रमाणे अनेक गावेदेखील याच रस्त्याशी जोडली गेली असून नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी, नागरिक यासह अवजड वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात होते.
बऱ्याच कालावधीपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले असून शहरातील सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या सुमारे २५० घंटागाड्या याच मार्गावरून जातात. यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येत असून तसे न झाल्यास भव्य रास्ता रोको करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी हिंडलगा, उचगाव, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, बाची आणि सुळगा आदी ग्रामपंचायतींचे अध्यक्ष – उपाध्यक्ष आणि सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.