बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्प बसविणे टाळण्यात आले होते. शिवप्रेमी आणि भीमप्रेमींनी दिलेल्या आंदोलनानंतर तब्बल दीड वर्षांनी याठिकाणी दोन्ही महापुरुषांची शिल्पं सन्मानपूर्वक बसविण्यात आली असून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
रेल्वे स्थानकावर अनेक महापुरुषांची शिल्पं बसविण्यात आली. मात्र जाणीवपूर्वक याठिकाणी छत्र. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पं बसविण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. याविरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि दलित समाज संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. वारंवार रेल्वे विभागाला अल्टिमेटम देण्यात आला होता. अखेर या आंदोलनाला यश आले असून दोन्ही महापुरुषांची शिल्पं रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी बसविण्यात आली आहेत.
यासंदर्भात बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेस्थानकावर छत्र. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पं बसविण्यात यावीत यासाठी आम्ही आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून समस्त शिवप्रेमी आणि भीमप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.
याचप्रमाणे कर्नाटक दलित संघर्ष समिती भीमवादचे रवी बस्तवाडकर बोलताना म्हणाले, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आम्ही या ठिकाणी छत्र. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषणाची शिल्पं बसविण्यासाठी आंदोलन करत आहोत. अलीकडेच १४ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा रेल्वेस्थानकाला घेराव घालून आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला होता. महिनाभराच्या कालावधीत शिल्पं बसविण्यात आली नाहीत तर स्वतः आम्ही संघटनेमार्फत शिल्पं बसवू असा इशाराही देण्यात आला होता. आमच्या या आंदोलनाची दखल घेत अखेर रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी शिल्पं बसविण्यात आली, याचा आम्हाला आनंद असल्याचे ते म्हणाले.
छत्र. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांची शिल्पं रेल्वेस्थानकाच्या तिकीट काउंटर विभागाच्या वरील बाजूस बसविण्यात आली असून दलित संघटनांच्या आणि श्रीराम सेना हिंदुस्तान च्या आंदोलनाला यश आले आहे.
तब्बल दीड वर्षानंतर शिवप्रेमी आणि शिवभक्तांची तसेच भीमप्रेमींची मागणी पूर्ण झाली असून रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवरायांची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिल्पं बसविल्याने शिवप्रेमी आणि भीमप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी आणि भीमसैनिकांनी मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला.
मंगळवारी सकाळपासूनच रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने शिल्पा बसवण्याचे काम सुरू केले होते सायंकाळी ते काम अंतिम टप्प्यात आले असते वेळी शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी दाखल होऊन या ठिकाणी आनंद व्यक्त केला.