बेळगाव लाईव्ह :बेळगाव या उत्तर कर्नाटकातील वेगाने विकसित होत असलेल्या शहराला दर्जेदार आणि किफायतशीर अशा दोन्ही प्रकारच्या रेल्वे सेवांद्वारे वर्धित रेल्वे कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे.
बेळगाव हे महत्त्वाचे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येत असल्यामुळे सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीची गरज अधिक तीव्र होत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या वंदे भारत रेल्वेने तिच्या वेग आणि आरामासाठी देशाचे लक्ष वेधून घेतले असताना दैनंदिन प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जनशताब्दी सारख्या अधिक किफायतशीर तरीही जलद रेल्वे सेवांची मागणीही जोर धरत आहे. भारतीय रेल्वेने बेळगावच्या वाढत्या लोकसंख्येसाठी उच्च गती (हाय-स्पीड) आणि खिशाला परवडणाऱ्या (बजेट-फ्रेंडली) रेल्वे सुरू करून सुवर्णमध्य गाठला पाहिजे.
वंदे भारत एक्सप्रेस प्रकरण : अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेग आणि प्रवासी सुविधांसाठी प्रसिद्ध असलेली वंदे भारत एक्सप्रेस भारतातील आधुनिक रेल्वे प्रवासाचे प्रतीक बनली आहे. वेग, आराम आणि सुविधा याला प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांसाठी तिची अर्ध-उच्च गती सेवा वरदान ठरत आहे. उद्योग आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करणाऱ्या बेळगावसारख्या शहरांना अशा प्रगत रेल्वे कनेक्टिव्हिटीचा खूप फायदा होईल. सध्या बेळगावला थेट वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा अभाव आहे. (16 सप्टेंबरपासून बेळगाव मार्गे पुणे ते हुबळी अशी घोषणा करण्यात आली आहे), ज्यामुळे बेंगलोर, पुणे आणि गोवा यांसारख्या महानगरांमध्ये जलद, अधिक कार्यक्षम रेल्वे सेवेची रहिवासी आणि वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांची इच्छा अपुरी राहत आहे.
वंदे भारत रेल्वे सुरू केल्याने प्रवासाच्या वेळा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात, ज्यामुळे व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी जलद व आरामदायक प्रवास करणे सोपे होईल.
जनशताब्दी गाड्यांची गरज : वंदे भारत ही रेल्वे प्रवासाची दर्जेदार बाजू दर्शवत असताना, किफायतशीर आणि तितक्याच कार्यक्षम गाड्यांची गरज दुर्लक्षित करता येणार नाही. बेळगावची विद्यार्थी, मजूर आणि छोटे व्यवसाय मालक यांची मोठी मध्यमवर्गीय लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर किफायतशीर प्रवास पर्यायांवर अवलंबून आहे. येथेच जलद पण स्वस्त सेवा देणाऱ्या जनशताब्दी किंवा तत्सम रेल्वे गाड्या अत्यावश्यक बनल्या आहेत. हवाई किंवा उच्च श्रेणी रेल्वे प्रवास न परवडणाऱ्या लोकांसाठी जनशताब्दी एक्स्प्रेस हा एक लोकप्रिय पर्याय आहे. कमीत कमी थांबे, वेगवान गती आणि खिशाला परवडणाऱ्या या गाड्या खर्च आणि वेळ यांच्यात समतोल साधणाऱ्या सामान्य माणसाच्या किंवा “आम आदमी” च्या गरजा पूर्ण करतात. गोवा -बेळगाव, पुणे -बेळगाव आणि बेंगलोर -बेळगाव हे मार्ग जनशताब्दी सेवांसाठी प्रमुख दावेदार आहेत.
बेळगावला दोन्ही गाड्यांची गरज का आहे? -आर्थिक वाढ : बेळगाव हे औद्योगिक मार्गिका (कॉरिडॉर) आणि भरभराटीचे शैक्षणिक गंतव्यस्थान आहे. वंदे भारत आणि जनशताब्दी या दोन्ही गाड्यांद्वारे जवळपासच्या शहरांशी होणारी कनेक्टिव्हिटी सुरळीत व्यावसायिक व्यवहार सुलभ करून आणि प्रतिभा आकर्षित करून या प्रदेशाच्या वाढीला चालना देईल.
दुहेरी मार्ग आणि विद्युतीकरण : एका बाजूला बेळगाव ते पुणे मार्ग आणि दुसऱ्या बाजूला बेंगलोर या मार्गांचे आधीच दुपदरी आणि विद्युतीकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे हे मार्ग जलद रेल्वे सेवांसाठी आदर्श आहेत. या पद्धतीने रेल्वे पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे भारतीय रेल्वेने अधिक वेगवान आणि कार्यक्षम गाड्या सुरू करून या क्षमतेचा लाभ घेण्याची वेळ आली आहे. उडान हवाई कनेक्टिव्हिटीचे उद्दिष्ट विमान प्रवास परवडणारा बनवण्याचे आहे. मात्र तरीही बेळगावच्या कनिष्ठ आणि मध्यम-उत्पन्न गटातील अनेकांना रेल्वेचा प्रवास सर्वोत्तम पर्याय वाटतो. जनशताब्दी गाड्या प्रवाशांच्या बजेटवर ताण न आणता जलद पर्याय देतात.
पर्यटन आणि शिक्षण : बेळगाव हे केवळ गोव्याच्या निसर्गसौंदर्याचे प्रवेशद्वार नाही तर शैक्षणिक केंद्र देखील आहे. वेगवान आणि वारंवार येणाऱ्या रेल्वे गाड्या या प्रदेशात पर्यटनाला चालना देतील आणि शेजारील शहरांतील विद्यार्थ्यांना बेळगावच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणे सुकर करतील. बेळगावमध्ये सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीची स्पष्ट मागणी आहे. व्यावसायिक प्रवासी आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येसाठी शहराला उच्च गती आलिशान वंदे भारत एक्स्प्रेसची गरज आहे. त्याचबरोबर जनशताब्दी एक्स्प्रेस सारख्या परवडणाऱ्या जलद गाड्या दैनंदिन प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील. बेळगाव हे श्रीमंत आणि बजेट-सजग अशा दोन्ही प्रवाशांच्या गरजेची पूर्तता करून देशाच्या इतर भागांशी चांगले जोडलेले राहील याची खात्री करण्यासाठी भारतीय रेल्वेने उपरोक्त रेल्वे सेवांच्या आवश्यकतांचा विचार केला पाहिजे.