बेळगाव लाईव्ह:बेळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज मंगळवारी हुबळी नैऋत्य रेल्वेचे सर्व व्यवस्थापक आणि अन्य वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजित बेळगाव -कित्तूर -धारवाड नव्या रेल्वे मार्ग योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच रेल्वे मार्ग उभारणीच्या कामाला ताबडतोब सुरुवात करण्याची सूचना केली.
बैठकीमध्ये बेंगलोर -धारवाड दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा प्रवास बेळगावपर्यंत विस्तारित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पुणे -बेळगाव -धारवाड वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा नुकतीच सुरू झाली आहे.
तसेच या रेल्वेची बेंगलोर -धारवाड रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढविण्यामध्ये कोणती तांत्रिक अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बेंगलोर -धारवाड वंदे भारत एक्सप्रेस लवकरात लवकर बेळगावपर्यंत सुरू करावी, अशी सूचना खासदार शेट्टर यांनी केली.
त्याचप्रमाणे सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवी देवस्थानाच्या ठिकाणी रेल्वे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले जावे आणि त्याचा अहवाल सादर करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. सौंदत्ती येथील सर्वेक्षण पूर्ण होताच बेळगाव येथून सावंतवाडीपर्यंत नवा कोकण रेल्वे संपर्क, तसेच बेळगाव -कोल्हापूर असा नवा रेल्वे मार्ग निर्माण करण्याची सूचना खासदारांनी केली.
बेळगाव -मिरज -बेळगाव मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सेवेचा कालावधी या सप्टेंबर अखेर समाप्त होत असला तरी प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे सेवा अधिक कालावधीसाठी पुढे सुरू ठेवावी. सध्या हुबळी येथून कुच्चीवल्लीपर्यंत सुरू असलेली रेल्वे सेवा बेळगावपर्यंत विस्तारित केली जावी. तसेच म्हैसूर-अजमेर एक्सप्रेस रेल्वेचा घटप्रभा स्थानकावर थांबा करावा.
त्याचप्रमाणे बेळगाव -पंढरपूर, हुबळी -बेळगाव -शिर्डी -कोपरगाव, बेळगाव -जोधपुर, बेळगाव -मुंबई असे नवे रेल्वे संपर्क निर्माण करावेत. बेळगाव जवळील देसुर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी चार रेल्वे पीट लाईन्सची निर्मिती केली जावी, अशा सूचनाही खासदार जगदीश शेट्टर यांनी केल्या. बैठकीत खासदार शेट्टर यांनी रेल्वेच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.