बेळगाव लाईव्ह : पावसामुळे बिकट झालेल्या बेळगाव-बाची रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
गांधी चौक ते कुद्रेमानी या गावापर्यंतच्या रस्त्याची चाळण उडाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामकाजाला अखेर सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी या परिसरातील अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करत आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. या रस्त्याची चाळण झाल्याने याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
गेल्या १५ दिवसांपूर्वी रस्त्याच्या संपूर्ण अवस्थेबाबत अहवाल देण्याच्या सूचना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रभर जागेची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.
हिंडलगा-सुळगा- तुरमुरी-बाची या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून, येथून हजारो वाहने आणि नागरिक दररोज ये-जा करतात. रविवारी स्वतः घटनास्थळी दाखल झालेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावले.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हेही दाखल झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे देखील यावेळी उपस्थित होते.