बेळगाव लाईव्ह : एकीकडे बेळगाव विमानतळावरून रद्द झालेल्या विमानफेऱ्यांमुळे बेळगावकरांमध्ये असमाधान व्यक्त होत असताना बेळगाव विमानतळाला लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणार असल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली आहे.
बेळगाव विमानतळ प्राधिकरण, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि दक्षिण पश्चिम विभागातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आज विमानतळ विकास, भूसंपादन प्रक्रिया, बेळगाव विमानतळाचे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये रूपांतर करण्याची गरज, रिंग रोड/बायपास रोड, या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली आहे.
बेळगाव विमानतळाचा विस्तार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात येणार असून यासाठी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासंदर्भात उद्भवणाऱ्या अडचणींसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच विमानतळ प्राधिकरणाला १४ एकर जमीन हस्तांतर करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. विमानतळाबाहेर ४ पदरी रस्ता करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन, जिल्हा पालकमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करून कामकाज सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे ट्रॅक उभारणीसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेही सांगितले. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून तातडीने हे कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे खासदार शेट्टर म्हणाले. बायपास – रिंगरोड संदर्भात अडचणीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असून लवकरच या कामकाजाला सुरुवात केली जाईल, असे ते म्हणाले.
हुबळी – पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा लाभ बेळगावकरांनाही घेता येणार आहे. सदर रेल्वे सेवा आठवड्यातून केवळ तीन दिवस सुरु राहणार आहे. मात्र भविष्यात जनतेचा प्रतिसाद पाहून हि सेवा दररोज सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील, तसेच बेळगाव ते बेंगळुरू मार्गावर देखील वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, याची जबाबदारी मी घेतली आहे, अशी प्रतिक्रियाही खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.
सदर बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक त्यागराज, बायपास रस्ता प्रकल्प संचालक .भुवनेश कुमार, नैऋत्य विभागाचे रेल्वे अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.