बेळगाव लाईव्ह – बेळगाव येथील पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 118 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य रंगमंदिर येथे खेळीमेळीत संपन्न झाली. बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेसाठी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील, व्यवस्थापकीय कमिटी चेअरमन अनंत लाड, संचालक शिवराज पाटील, सुवर्णा शहापूरकर, गजानन पाटील, रवी दोडन्नावर, यल्लाप्पा बेळगावकर, लक्ष्मी कानुरकर ,सुहास तराळ, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, मारुती सिगीहळी, बसवराज इट्टी रोहन चौगुले,सीईओ सौ अनिता मूल्या आणि नितीन हिरेमठ, ज्ञानेश्वर सायनेकर, कमलेश मायानाचे हे संचालक उपस्थित होते.
सभेची सुरुवात सीईओ अनिता मूल्या यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर गतसालात दिवंगत झालेल्या सभासदांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत करुन चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
“गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळला असून बँकेच्या आजवरच्या इतिहासात बँकेने प्रथमच 156 कोटी 70 लाखाच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे .116 कोटी 12 लाखाची कर्जे वितरीत केली आहेत. बँकेचा एनपीए शून्य टक्के असून अहवाल सालात बँकेच्या ठेवीत 29 कोटी 23 लाखाची भरघोस वाढ झाली आहे. तसेच 21 कोटी 96 लाखाची कर्जामध्येही वाढ झाली आहे . बँकेचे संपूर्ण कामकाज रिझर्व बँकेच्या निर्देशनाप्रमाणे चालते. सीआरएआर प्रमाण 12% असावे असा रिझर्व निर्देश आहे पण आपल्या बँकेचे हे प्रमाण 14.43% आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत गेली सतत तीन वर्षे ऑडिट रेटिंग ए मिळाले आहे.
बँकेने सभासदाच्या हिताच्या योजना नेहमीच आखलेल्या आहेत. यावर्षी अ वर्ग सभासदांना 20 टक्के तर ब वर्ग सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे” असे म्हणताच टाळ्यांच्या गडगडाटात हे मंजूर करण्यात आले.
” 75 वर्षाहून अधिक वयाच्या सभासदांना भेटवस्तू ,स्मृतिचिन्ह देऊन एका समारंभात अलीकडेच गौरविण्यात आले. तसेच साठ वर्षावरील वयाच्या व 25 वर्षे सभासद असलेल्याना दोन हजार रुपयाचे गौरवधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा अनेक सभासदांनी लाभ घेतला आहे.” असे ते म्हणाले.
बँकेच्या लेखापरीक्षण अहवालात कोणतेही गंभीर दोष आढळलेले नाहीत तसेच संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची कर्जेही वितरित करण्यात आलेली नाहीत. मात्र बँक, घर खरेदी, घर बांधणी, घर दुरुस्ती ,व्यवसाय ,लघुउद्योगव वाहन खरेदीसाठी कर्जाचा पुरवठा करीत आहोत.
“2021-22 या आर्थिक वर्षापासून बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली असून ‘अ ‘वर्ग सदस्यांसाठी यशस्वीनी आरोग्य विमा राबवली आहे.महिला सबलीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी बँकेने ग्रुप मायक्रो फायनान्स सुरू केले त्याचा शेकडो महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी उपयोग झालाआहे.
*बँकेच्या तीन नव्या शाखा*
बँकेच्या तीन नव्या शाखा सुरू करण्यास रिझर्व बँकेने परवानगी दिली असून लवकरच हिंडलगा, वडगाव आणि कणबर्गी येथे शाखा चालू करण्यात येणार आहेत. त्या शाखांसाठी जागा निश्चित करण्यात आली असून फर्निचर व इतर तयारी सुरू आहे. अशी माहिती त्यांनी दिली. बँकेच्या फायनान्शिअल बाबी व्यवस्थापक भूषण अंकले यांनी सादर केल्या.
सर्व ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. नव्या शाखा सुरू होणार असल्याबद्दल व संस्थेने जे अनेक उपक्रम राबवले त्याबद्दल अनेकानी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. या आर्थिक वर्षात २०० कोटीच्या ठेवीचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाहीही श्री अष्टेकर यांनी दिली.
त्यावेळी झालेल्या चर्चेत सभासद सर्वश्री विकास कलघटगी, देवकुमार बिरजे, नारायण किटवाडकर, विठ्ठल पोळ ,विजय मोरे, मल्लेश चौगुले, परशराम मुरकुटे, शरद माने, दुधाजी खनुकर, परशराम माळी, बसवंत मायानाचे ,शिवाजी राक्षे ,सुनील देसुरकर आदींनी भाग घेतला . नगरसेवक रवी साळुंखे व अनेक सभासदांनी पुष्पगुच्छ अर्पण करून चेअरमन अष्टेकर यांचा सन्मान केला. व्हाइस चेअरमन रणजित चव्हाण पाटील यांनी आभार मानले.