बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहात कन्नड अभिनेता दर्शन सिगारेट ओढताना आणि कॉफी पिताना दिसल्यानंतर कर्नाटक कारागृह विभागाने सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिली. परप्पन अग्रहार कारागृहातील सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर अभिनेता दर्शनाला हिंडलगा कारागृहात हलविण्यात येण्याची शक्यता असून याबाबत गृहमंत्र्यांना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, याबाबत विचार सुरु असून कारागृह विभाग यावर योग्य तो निर्णय घेईल.
एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कॉफीचा मग घेतलेल्या दर्शनचा कारागृहात बसलेला फोटो रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वादाला तोंड फुटले. छायाचित्रात दर्शनचा व्यवस्थापक आणि इतर दोन कैदीही त्याच्यासोबत बसलेले दिसत होते. हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके वायरल झाले कि यावरून विरोधकांनी पुन्हा सरकारवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले.
या प्रकारावर गृहमंत्री जी परमेश्वर यांनी खुलासा केला असून, या घटनेनंतर तुरुंग महासंचालक मालिनी कृष्णमूर्ती यांनी तात्काळ बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पहाटे 1 वाजेपर्यंत चौकशी केली.
प्राथमिक निष्कर्षांच्या आधारे, कारागृहाशी संबंधित सात अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. तपास सुरू ठेवण्यासाठी तुरुंग महासंचालकांनी सोमवारी सकाळी बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली.