बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सीपीएड मैदानाजवळील वनिता विद्यालय शाळेच्या गेट जवळ मोठे झाड चालत्या मालवाहू रिक्षावर कोसळले. मात्र सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळला असून मालवाहू रिक्षाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
हा परिसर शालेय विद्यार्थ्यांसह वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. अलीकडेच अनेक धोकादायक वृक्षांच्या फांद्या, धोकादायक वृक्ष हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती.
यामध्ये अनेक ठिकाणच्या अनावश्यक झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र शहरातील विविध ठिकाणचे धोकादायक वृक्ष, वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आल्या नाहीत. आज झालेल्या या अपघातात सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गजबजलेल्या ठिकाणी घडलेला हा प्रकार नक्कीच भीतीदायक होता.
झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील काही काळ ठप्प झाली होती. सदर मालवाहू रिक्षा बैलहोंगल हुन घरातील साहित्य बेळगावला घेऊन जात होती.
यादरम्यान सीपीएड मैदानानजीक हा अपघात घडला असून नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या या परिसरात सुदैवानेच मोठा अनर्थ टळला आहे. मात्र नजीकच्या काळात अशा धोकादायक वृक्षांसंदर्भात निर्णय घेऊन असे वृक्ष हटविणे, धोकादायक पद्धतीत असलेल्या फांद्या कापणे गरजचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.