बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात उगमस्थान असणाऱ्या मार्कंडेय नदीला बारमाही वाहते करून शेतकऱ्यांना सोयीस्कर ठरविण्यासाठी सोमवारी बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी तसेच निंगाप्पा जाधव पुंडलिक पावशे,पुंडलिक मोरे नेताजी बेनके आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
बेळगांव तालुक्यातील पश्चिम भागात उगमस्थान असणारी मार्कंडेय नदी बारमाही वाहती करून पश्चिम भागातील शेतजमीन बारमाही ओलिताखाली ठेवून हरित क्रांती घडवून आणण्याचा विचार करण्यात यावा, ‘तिलारी धरण महाराष्ट्र’ कालव्याने नदीला जोडण्यासंबंधीची योजना आखण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. सदर प्रस्ताव तुडये-पंचायत सदस्य तसेच सिमालगत गावकर्यांना,स्थानिक प्रतिनिधींना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या पुढाकारातून खासदारांकडे सादर करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात मार्कंडेय नदी कोरडी पडते त्याच्यापासून नदी काठी असलेले शेत शिवार ओसाड पडते तिलारी धरणाचे पाणी मार्कंडेय नदीला वळवले गेले तर या भागातील शेतकरी समृध्द होतील.जसे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे शेतकरी कोणताही उद्योग धंदा नसताना सतत पाणी असल्यामुळे साधन समृध्दीने शेतकऱ्यांची भरभराट झाली आहे याचं प्रकारचे जीवन मार्कंडेय नदी काठचे शेतकरी जगू शकतात त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे.
या शिवाय मार्कंडेय नदी काठावरील आजू बाजूच्या गावांना मुबलक पाण्याचा पुरवठा होईल यासाठी सरकारने ही योजना अमलात आणल्यास त्याचा फायदा होईल असे मत तालुका म. ए समिती नेते दीपक पावशे यांनी बेळगाव live शी बोलताना व्यक्त केले.
रिंग रोड बायपास आणि रेल्वे मार्गात जमीन संपादन करण्याचा आदेश देणाऱ्या खासदार महोदयांनी शासकीय योजनांसाठी शेतकऱ्याच्या जमिनी संपादनाकडे पुढाकार घेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या या योजनेचा पाठपुरावा का करू नये असा सवाल देखील दीपक पावशे यांनी live शी बोलताना केला आहे.