बेळगाव लाईव्ह : महात्मा फुले रोड, बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड दरम्यान राबविण्यात आलेल्या रस्ते विकासकामात नियमबाह्य भूसंपादनाप्रकरणी उच्च न्यालयाने विस्थापितांना २० कोटींची भरपाई देण्याचे आदेश बजावले.
गेल्या आठवड्याभरापासून हे प्रकरण गाजत असून याची भरपाई जरी महानगरपालिका देत असली तरी अप्रत्यक्षरीत्या हा जनतेचाच पैसा वाया जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता नागरिकांच्या भुवयाही या प्रकरणी उंचावल्या असून सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांच्या पुढाकारातून महानगरपालिका बचाव अभियान सुरु करण्यात आले आहे.
आज बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, कि या प्रकरणी मास्टरमाइंड कार्यरत आहे. नियमबाह्य पद्धतीने भूसंपादन करण्यामागचा खरा सूत्रधार कोण असावा? यामागे केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे कि अधिकाऱ्यांचा बोलविता धनी कुणी बलाढ्य राजकारणी आहे? असा प्रश्न उपस्थित करत सुजित मुळगुंद यांनी याप्रकरणाचा तपास न्यायालयीन पातळीवरच झाला पाहिजे, घडल्या प्रकारची न्यायालयीन चौकशी आणि तपास केला पाहिजे, असे झाले तर अधिकारी देखील तोंड उघडतील, असा दावा त्यांनी केला आहे.
बेळगावकरांवर या माध्यमातून झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘महानगरपालिका बचाव’ हे जनआंदोलन हाती घेण्यात येणार आहे. काही बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कृतींमुळे बेळगावच्या नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडला असून रस्ता रुंदीकरण भरपाई आदेशानंतर मनपा कोणत्या आधारावर भरपाई देण्यास तयारी झाली? यानंतर मनपा तिजोरीवर झालेल्या परिणामामुळे नागरी सुविधांवर कोणता परिणाम होईल? असे प्रश्न सुजित मुळगुंद यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.
याप्रकरणी ज्या अधिकाऱ्यांमुळे हि कारवाई झाली त्या अधिकाऱ्यांनाच आर्थिकदृष्ट्या जबाबदार धरून याप्रकरणी गुंतलेल्या अधिकाऱ्यांची न्यायालयीन पातळीवर चौकशी व्हावी, जेणेकरून नागरिकांच्या माथी मारण्यात आलेली दंडात्मक कारवाई टाळता येऊ शकेल, शिवाय या प्रकरणामागे ‘मास्टर माईंड’ पद्धतीने काम केलेल्या राजकारण्यांचीही माहिती उघड होईल.
याप्रकरणी बेकायदा पाडण्याचे आदेश का दिले गेले आणि कोणाच्या अधिकारावर दिले गेले? उपायुक्तांच्या अहवालात नाव असलेल्या अधिकाऱ्यांची स्थिती काय आहे? बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने स्वतःचे योग्य प्रतिनिधित्व का केले नाही? असे प्रश्न उपस्थित करून जबाबदार अधिकाऱ्यांना याचा जाब विचारून कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
याप्रकरणी बेळगावच्या नागरिकांनी देखील शांत बसू नये. झाल्याप्रकरणी न्यायाची मागणीकरावी, शहर पारदर्शकतेने, निष्पक्षतेने आणि कायद्यानुसार चालावे यासाठी बेळगाव मनपा वाचवा या मोहिमेत बेळगावमधील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सुजित मुळगुंद यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेत वकील नितीन बोळबुंदी उपस्थित होते.