बेळगाव लाईव्ह : भारतात कृषी संपत्तीचा मोठा वारसा लाभला आहे. देशातील जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोक शेती करतात. आधुनिकतेबरोबर शेतीच्या पद्धतींत आणि तंत्रज्ञानातही महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या आगमनाने, कृषी क्षेत्रात अनेक नवीन बदल घडत असून आता बेळगावमध्येही कृषी क्षेत्रात एक नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्हा पालक मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभाग आणि रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने ड्रोनचा वापर करून पिकांवर पोषक द्रव्यासहित कीटकनाशकांची फवारणी करण्याचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज या उपक्रमाची यमकनमर्डी मतदारसंघात सुरुवात केली. या नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केवळ ७ ते ८ मिनिटांत प्रति एकरात पिकांवर पोषक द्रव्यासहित कीटकनाशकांची फवारणी करता येणे शक्य आहे.
पेरणीपूर्व मशागत, पेरणी, रोप लागवड यासारख्या अनेक प्रक्रियेतून शेतकऱ्याला पिकासाठी रात्रंदिवस राबावे लागते. केवळ शारीरिक कष्टच नाही तर आर्थिक भार देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतो. अशातच नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागतो. मात्र नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना हळूहळू सर्व गोष्टी सुकर होत असून आता पिकांची मुबलक वाढ व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पोषक तत्वे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अधिक उत्पादन घेऊ शकतो. शेतकऱ्यांनी काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पालकमंत्र्यांनी केले असून हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान आहे असे मत जिल्हा पालकमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
पेरणीपूर्व मशागती आणि पेरणीनंतर होणाऱ्या मशागतीदरम्यान शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्युतभारित तारेचा धोका, वीज पडणे, सर्पदंश यासारख्या अनेक संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अशा समस्यांवर आणि संकटांवर उपचार म्हणून ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला असून या नव्या तंत्रज्ञाच्या आधारे एक एकर क्षेत्रात खते आणि कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी सुमारे 4-५ तासांऐवजी अत्यंत कमी विल लागणार आहे. उंच पिके सुरक्षित ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे अवघड होते.
यामुळे कृषी विभागाने नवीन तंत्रज्ञानाद्वारे वेळ व पैशाची बचत करून शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढला आहे. बेळगाव जिल्ह्यात फवारणीसाठी ४५ ड्रोन उपलब्ध असून कित्तूर , बैलहोंगल बागेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी त्याचा आधीच लाभ घेतला आहे. भाडेतत्वावर ज्या शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून घ्यावयाचा आहे त्यांनी शेतकरी संपर्क केंद्रांद्वारे कृषी विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.