Wednesday, November 27, 2024

/

एसडीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रामुख्याने मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर चालवण्यात येत असलेला खटला आणि वक्फ कायद्यातील प्रस्तावित बदल, याच्या विरोधात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या बेळगाव जिल्हा शाखेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर केले.

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष मकसूद सलाउद्दीन मकानदार यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त बाबींच्या निषेधाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. देशभरात काही गंभीर प्रकरणांमध्ये ठराविक लोकांना निष्कारण गोवले जात असून संबंधित राज्यांद्वारे त्यांच्यावर खटला चालविला जात आहे. यापैकी पहिले प्रकरण मुफ्ती सलमान अझहरी यांच्या संदर्भात आहे. त्यांच्यावर बहुदा राजकीय उद्देशाने अयोग्यरीत्या खटला दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात संदर्भात योग्य पुरावे नसल्यामुळे कायदा व्यवस्थेचा गैरवापर करून त्यांना लक्ष्य करण्याचा हा प्रकार आहे असे वाटते दुर्दैवाने ही अशी एकच घटना नाही तर अशा स्वरूपाच्या अनेक घटना देशभरात घडत असून ज्यामुळे आपल्या देशातील कायदा व्यवस्थेची निष्पक्षता आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांना धोका निर्माण झाला आहे. वक्फ कायद्यातील प्रस्तावित बदल ही दुसरी एक चिंतेची बाब आहे. हे बदल संपूर्ण भारतातील मुस्लिम समुदायाला चिंतेत टाकणारे आहेत. या बदलामुळे वक्फ मालमत्तेचे स्वातंत्र्य कमी होईल आणि त्या मालमत्ता सरकार अन्यायाने ताब्यात घेईल अशी भीती अनेकांना वाटत आहे. ही बाब फक्त घटनेच्या विरोधातच नाही तर धार्मिक समुदायांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. याखेरीस देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अटक सत्र राबवून लोकांना निष्पक्ष चांचणीशिवाय तुरुंगात डांबण्यात येत आहे.Sdpi protest

यापैकी बहुतांश लोक उपेक्षित समुदायातील असून कोणतेही सबळ कायदेशीर कारण नसताना त्यांना अटक करण्यात आली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. तसेच मुफ्ती सलमान अझहरी यांच्या प्रकरणाचे पुनरावलोकन केले जावे. त्यांच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत ठोस पुराव्यांसह कारवाई होईल असे पहावे. त्याचप्रमाणे वक्फ कायद्यातील प्रस्तावित बदलांचा फेरविचार केला जावा. देशभरात बेकायदेशीररित्या राबविण्यात आलेल्या अटक सत्राची चौकशी केली जावी आणि अन्यायाने तुरुंगात डांबण्यात आलेल्यांना मुक्त करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.

एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष मकसूद सलाउद्दीन मकानदार यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमचे धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर हल्ले करून त्यांना जाणून बुजून लक्ष्य केले जात आहे. अन्यायकारकरित्या त्यांना बेकादेशीरपणे तुरुंगात डांबण्यात आले आहे. गुजरात न्यायालयातील त्यांच्या खटल्याच्या सुनावणीची तारीख आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. या पद्धतीने त्यांच्या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असून हा अन्याय आहे असे सांगून केंद्रातील एनडीए सरकार कायद्याच्या चौकटीत काम न करता हुकूमशाही करत आहे, असा आरोप मकानदार यांनी केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.